भारताचा कर्णधार प्रदीर्घ काळ खेळण्यावर ठाम; आशिया स्पर्धेसाठी संघ बांगलादेशला रवाना
एकच प्रश्न वेगवेगळ्या निमित्ताने विचारला म्हणून माझे उत्तर बदलणार नाही असे स्पष्ट करत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर धोनी निवृत्त होणार अशा चर्चेला उधाण आले आहे. पत्रकार परिषदा, जाहिरातींचे कार्यक्रम अशा प्रत्येक ठिकाणी धोनीला निवृत्तीविषयी छेडले जाते. सतत होणाऱ्या बोलंदाजीला कंटाळलेल्या धोनीने थेट शब्दांत निवृत्तीबाबतच्या भावना व्यक्त केल्या. आणखी बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे असे धोनीने स्पष्ट केले.
‘हाच प्रश्न तुम्ही पंधरा दिवसांपूर्वी किंवा महिनाभरापूर्वी विचारला असता तरी माझे उत्तर बदलले नसते. तुम्ही निवृत्तीचा प्रश्न फिरवून विचारलात तरी माझे उत्तर तेच राहील. जसे माझे नाव काय विचारलेत तर महेंद्रसिंग धोनी हे उत्तर साहजिक आहे तेवढेच निवृत्तीबाबतचे उत्तर साहजिक आहे. नजीकच्या काळात मी निवृत्त होणार नाही. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारात मी खेळतो. या दोन्ही प्रकारांत आणखी बराच काळ खेळायचा विचार आहे’, असे धोनीने आशिया चषकासाठी बांगलादेशला रवाना होण्यापूर्वी सांगितले. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर धोनीने तडकाफडकी निवृत्ती घेतली होती.
निवृत्तीच्या प्रश्नांनी वैतागलेला धोनी म्हणाला, ‘तुम्ही मला थेट प्रश्न विचारा, ई-मेल करा किंवा पत्र पाठवा. निवृत्तीसंदर्भातील प्रश्नाचे उत्तर बदलणार नाही. प्रश्न विचारण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे याचा अर्थ वाट्टेल ते विचारावे असा होत नाही. आपण काय विचारतोय, कधी विचारतोय, त्याचा संदर्भ योग्य आहे का याचा साकल्याने विचार व्हायला हवा. प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला व्यासपीठ मिळाले आहे तर त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी केला जाऊ शकतो. प्रत्येक गोष्टीकडे माध्यमांचे लक्ष असते. जिंकलो तरी प्रश्न पडतात, झटपट हरलो तरी प्रश्नांची सरबत्ती केली जाते. चांगले प्रश्न विचारले गेले तर मी नक्कीच उत्तर देईन’.
विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघ बांगलादेशात होणाऱ्या आशियाच चषकात खेळणार आहे. स्पर्धेसाठी तयारीविषयी धोनी म्हणाला, ‘ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी सराव सामने खेळायला मिळत नाहीत. पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध आम्ही ट्वेन्टी-२० मालिका खेळलो आणि जिंकलो. आता आशिया चषकातही ट्वेन्टी-२० प्रकारातच खेळणार आहोत. संतुलित स्थिर संघ तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकाला संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. बांगलादेशमधील खेळपट्टय़ा भारतीय संघाला अनुकूल आहेत. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती होणे आवश्यक आहे. विश्वचषक जिंकण्याची क्षमता भारतीय संघात आहेत. संपूर्ण संघ तंदुरुस्त असणे गरजेचे आहे’.

लष्करामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित
* अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्दय़ावरून देशभरात आणि समाजमाध्यमांवर रणकंदन माजलेले असताना भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने परखड मत मांडताना सणसणीत चपराक लगावली आहे. लष्कर आपल्या कामाप्रति समर्पित असल्यामुळेच आपण अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर खल करू शकतो, असा टोला धोनीने मारला आहे.
* धोनी ‘लेफ्टनंट कर्नल’ या मानद पदावर कार्यरत आहे. लष्करी दल आणि कमांडो पथकातील मंडळी आपल्यासारखेच सामान्य नागरिक आहेत; परंतु देशप्रेमाने प्रेरित आणि विशेष प्रशिक्षित ही मंडळी स्वत:आधी देशाचा विचार करतात’, असे धोनीने ट्विटर हँडलवर म्हटले आहे.