मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक महान फलंदाज होता. त्याने २४ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विक्रम मो़डले. भारतातच नव्हे, तर भारताबाहेरदेखील सचिनने गोलंदाजांची धुलाई केली. सचिनला बाद करणे हे त्याच्या काळातील प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असायचे. त्यातच विश्वचषक स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा असेल, तर प्रतिस्पर्धी संघाचा सचिनला बाद करण्याचा आनंद द्विगुणित व्हायचा. पण एका विश्वचषकात सचिनला बाद केल्याचे वाईट वाटले अशी खंत माजी पाकिस्तानी खेळाडूने बोलून दाखवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००३ च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरोधात भारताकडून खेळताना सचिन तेंडुलकरने ९८ धावांची खेळी केली. पण दुर्दैवाने शोएब अख्तरच्या एका बाऊन्सर चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यामुळे तेंडुलकर आणि भारतीय चाहत्यांना खूपच वाईट वाटले यात वादच नाही. पण त्याचसोबत सचिनला बाद करणाऱ्या अख्तरलादेखील त्यावेळी सचिनचे शतक हुकल्याचे वाईट वाटले. त्याने स्वत: ‘हेलो’शी बोलताना याची कबुली दिली.

सचिन ९८ धावांवर बाद झाला तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. त्याची खेळी खूपच खास होती, त्यामुळे त्या खेळीत त्याने शतक झळकवायला हवं होतं. मला स्वत:लासुद्धा सचिनचं शतक व्हावं असं वाटत होतं. मला त्याने आधी एकदा बाऊन्सर चेंडूवर षटकार लगावला होता, त्यामुळे मी त्याला बाऊन्सर चेंडू टाकला. त्यावर सचिन षटकार ठोकेल असं मला वाटलं होतं, पण तो बाद झाला”, असे अख्तर म्हणाला.

सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांची अनेकदा तुलना केली जाते. त्यावरही अख्तरने मत व्यक्त केले. “या दोघांची तुलना करणे बरोबर ठरणार नाही. विराटला सचिनचा वारसदार मानले जात असून विराटनेदेखील कमी कालावधीत बरेच विक्रम मोडीत काढले आहेत. पण तरीदेखील दोन युगातील दोन महान खेळाडूंची तुलना करणे अयोग्य आहे. सचिनने क्रिकेटच्या सर्वात कठीण युगात फलंदाजी करून स्वत:ला सिद्ध केले. जर तो आताच्या युगात क्रिकेट खेळत असता, तर त्याने सुमारे १ लाख ३० हजार धावांचा टप्पा ओलांडला असता”, असे अख्तरने ‘हेलो’साठी दिलेल्या व्हिडीओ मुलाखतीत सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I was very sad because sachin got out for 98 and missed century says pakistani bowler shoaib akhtar vjb
First published on: 22-05-2020 at 10:14 IST