ICC Suspends USA Cricket Board: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसीने) अमेरिकन क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का दिला आहे. आयसीसीने तत्काळ प्रभावाने अमेरिकन क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीचं सदस्यत्व असताना संघांना काही जबाबदाऱ्यांचं पालन करावं लागतं. पण अमेरिकन क्रिकेट बोर्डाकडून सातत्याने जबाबदाऱ्यांचं उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे आयसीसीने ही कारवाई केली आहे.
ऑलिम्पिक २०२८ स्पर्धेचा थरार लॉस एंजिलिसमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत क्रिकेटचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्यापूर्वी अमेरिकन क्रिकेट बोर्डाबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय संघांना या स्पर्धेत सहभागी होण्याची आणि या भव्य कार्यक्रमाची तयारी करण्याची अनुमती देण्यात आली आहे.
आयसीसीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आयसीसीने बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या संविधानानुसार, आयसीसीचे सदस्य म्हणून अमेरिकन क्रिकेट बोर्डाने सातत्याने आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.”
आयसीसीकडून नेमली जाणार समिती
अमेरिका क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती.या स्पर्धेचे आयोजन अमेरिकेत केले गेले होते. आता अमेरिकन क्रिकेट बोर्डात सुधारणा आणि नवीन संरचना करण्यासाठी आयसीसीकडून नवीन समिती नेमली जाणार आहे. ही समिती कार्यप्रणाली आणि शासकीय व्यवस्थापन या सर्व गोष्टीत बदल करण्याची रूपरेषा निश्चित करेल. अमेरिकन क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व रद्द करणे, हा निर्णय दुर्दैवी असल्याचं आयसीसीने सांगितलं आहे. पण खेळाचा दीर्घकालीन हिताचा विचार करता हा निर्णय घेणं अतिशय महत्वाचं असल्याचं आयसीसीने सांगितलं आहे.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचे आयोजन अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत अमेरिकेने दमदार कामगिरी केली होती. पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप स्पर्धा खेळत असलेल्या अमेरिकेने कॅनडा आणि पाकिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली होती.