भारतीय संघाकडून पाकच्या संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. भारताविरुद्धची पाकिस्तानी खेळाडूंची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची होती. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत पाकच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानंतर फलंदाजीतही पाकला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या संघावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या टीकेला सामोरे गेल्यानंतर आता पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद यानेही खेळाडूंना ताकीद दिल्याचे समजत आहे. पाकिस्तानमधील मीडिया आउटलेट असलेले दन्यूज.कॉम.पीके यांच्या वृत्तानुसार सर्फराज याने खेळाडूंना खेळ सुधारण्याची ताकीद दिली आहे. खेळाडूंनी आपला विश्वचषक स्पर्धेतील खेळ सुधारायला हवा. कारण स्पर्धेनंतर मी एकटाच मायदेशी परत जाणार नाहीये. माझ्याबरोबर पूर्ण संघ असणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांचे शिव्या शाप आणि त्यांच्या रोषाला केवळ मला एकट्याला सामोरे जावे लागणार नसून साऱ्यांनाच ते सोसावे लागणार आहे. जर तसे करायचे नसेल, तर आताच खेळ सुधारा आणि चांगली कामगिरी करून दाखवा, अशी ताकीद त्याने पाकच्या खेळाडूंना दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर सलग सातवा विजय मिळवला. भारताने १९९२, १९९६, १९९९, २००३, २००७, २०११, २०१५ आणि २०१९ अशा सलग ७ विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकला धूळ चारली. यंदाचा पराभव हा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंवर चाहत्यांनी भरपूर टीका केली. काहींनी टीका करताना शाब्दिक पातळी सोडली आणि अपशब्द देखील वापरले. यावर पाकचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने ट्विट करत चाहत्यांना शिव्या न देण्याची आणि अपशब्द न वापरण्याचीही विनवणी केली होती.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cricket world cup 2019 ind vs pak india pakistan captain warning sarfraz ahmed pak players vjb
First published on: 19-06-2019 at 11:22 IST