गेल्या दोन महिन्यांपासून आयपीएलचा थरार समस्त क्रीडाप्रेमींनी अनुभवला. रविवारी एकीकडे आयपीएलच्या अंतिम सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना दुसरीकडे टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेध क्रिकेटप्रेमींना लागल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेचे निकाल लागण्याआधीच क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं बिगुल वाजणार असल्यामुळे आता क्रिकेटप्रेमींचा मोर्चा त्यांच्या त्यांच्या आवडत्या आयपीएल संघांकडून टीम इंडियाच्या कामगिरीकडे वळणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा पारंपरिक प्रतिस्पर्धी मानला जाणाऱ्या पाकिस्तानच्या संघाबाबत त्यांच्याच माजी कर्णधारानं केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

शाहिद आफ्रिदीला वर्ल्डकपची चिंता!

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानच्या क्रिकेट संघाबाबत आपलं विश्लेषण केलं आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या संघाची कामगिरी कशी राहील? अशी विचारणा केली असता शाहीद आफ्रिदीनं पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाच्या एका कमकुवत बाजूवर भाष्य केलं. पाकिस्तानच्या संघानं मधल्या षटकांमध्ये आपल्या फलंदाजीत सुधारणा करणं गरजेचं असल्याचा सल्ला आफ्रिदीनं पाकिस्तान संघाला दिला आहे.

यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघाचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. या गटात पाकिस्तानसमवेत भारत, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा हे संघ आहेत. पाकिस्तानचा पहिला सामना ६ जून रोजी यजमान अमेरिकेशी होणार आहे. न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानची गाठ भारताशी पडेल. इतर संघ तुलनेनं पाकिस्तानसाठी सोपे असले, तरी भारताशी दोन हात करणं पाकिस्तानला कठीण जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान संघातील कमकुवत दुव्यावर शाहिद आफ्रिदीनं बोट ठेवलं आहे.

काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?

एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानच्या फलंदाजीवर बोट ठेवलं आहे. “आमच्या फलंदाजांचा स्ट्राईक रेट ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. विशेषत: मधल्या षटकांमध्ये त्यांची फलंदाजी संथ गतीने होते. ७ ते १३ या षटकांमध्ये पाकिस्तानी फलंदाजांनी त्यांचा स्ट्राईक रेट सुधारायला हवा. या षटकांमध्ये पाकिस्ताननं साधारणपणे ८ ते ९ धावा प्रत्येक षटकात वसूल केल्या पाहिजेत. मात्र, असं असलं तरी यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तान हीच माझी फेव्हरेट टीम असेल”, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे.

“टीम इंडियाकडून काही धोका नाही, त्यांचे खेळाडू तर..”, विश्वचषकाआधी इंग्लंडच्या खेळाडूनं भारताला कटू शब्दात डिवचलं

हुकमाचा एक्का, बाबर आझम!

दरम्यान, शाहिद आफ्रिदीच्या मते पाकिस्तानसाठी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत बाबर आझम हाच हुकमाचा एक्का ठरणार आहे. “संघातले सगळेच खेळाडू महत्त्वाचे आहेत. पण जर तुम्ही गेल्या काही काळातली कामगिरी पाहिली, तर बाबर आझमनं मोठी भूमिका पार पाडणं आवश्यक आहे. पण तसं पाहाता मोहम्मद रिझवान, फखर झमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ, शादाब खान हे सगळेच खेळाडू संघाच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावतात. हेच खेळाडू पाकिस्तानसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत”, असं शाहीद आफ्रिदी म्हणाला.

बाबर आझमनं आत्तापर्यंत ८० टी-२० सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी ४६ सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळाला असून २६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सात सामने अनिर्णित राहिले. कर्णधार म्हणून त्याची सामने जिंकण्याची सरासरी ५७.५० इतकी आहे. त्याशिवाय, टी-२० प्रकारामध्ये बाबर आझम सर्वाधिक धावांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्यानं ११८ सामन्यांमध्ये ४१.१९ च्या सरासरीने ३९५५ धावा केल्या आहेत. यात ३ शतकं आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत विराट कोहली ४०३७धावांसह अव्वल स्थानी तर कर्णधार रोहित शर्मा ३९७४ धावांसह दुसऱ्या स्थानी आहेत.