चेन्नई : ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी), अॅशेस आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर आता पॅट कमिन्स ‘आयपीएल’ विजेता कर्णधार म्हणून मिरवण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, त्यासाठी रविवारी चेन्नई येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १७व्या हंगामाच्या अंतिम लढतीत कमिन्सच्या सनरायजर्स हैदराबाद संघाला कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान परतवून लावावे लागेल.

केवळ वर्षभरातील कामगिरीच्या आधारे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक म्हणून नाव कमावणे सोपे नाही. मात्र, हे अवघड काम कमिन्सने अगदी सहजपणे करून दाखवले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतातच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ विजेता ठरला. त्यानंतर आता भारतात खेळताना हैदराबादच्या संघाला ‘आयपीएल’चा करंडक मिळवून देण्यापासून कमिन्स केवळ एक पाऊल दूर आहे.

हेही वाचा >>>हार्दिक पंड्याच्या संपत्तीतील इतका मोठा हिस्सा होणार नताशाच्या नावे? घटस्फोटाच्या चर्चेत नवा ट्विस्ट

‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात एडीन मार्करमच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ गुणतालिकेत तळाला राहिला. त्यानंतर हैदराबादने खेळाडू लिलावात कमिन्सला तब्बल २०.७५ कोटी रुपयांत खरेदी केले आणि त्याच्याकडे नेतृत्वाची धुराही सोपवली. कमिन्सला यापूर्वी कोणत्याही लीगमध्ये किंवा ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव नव्हता. मात्र, हैदराबादने कमिन्सवर विश्वास दाखवला आणि त्याने तो सार्थकी लावला. कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादच्या संघाने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, आता लयीत असलेल्या वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन या कोलकाताच्या फिरकी गोलंदाजांसमोर हैदराबादच्या आक्रमक फलंदाजांचा कस लागू शकेल.

कोलकाता हा यंदाच्या हंगामात सर्वांत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणून पुढे आला. श्रेयस अय्यरचे चणाक्ष नेतृत्व, त्याला मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि प्रेरक (मेंटॉर) गौतम गंभीरच्या अचूक योजनांची मिळालेली साथ यामुळे कोलकाताने १४ पैकी नऊ साखळी सामने जिंकताना (दोन सामने पावसामुळे रद्द, तीन पराभव) गुणतालिकेत अग्रस्थान पटकावले. त्यानंतर ‘क्वॉलिफायर-१’च्या सामन्यात हैदराबादला नमवत कोलकाताने अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता हैदराबादवर पुन्हा वर्चस्व गाजवत तिसऱ्यांदा ‘आयपीएल’ जिंकण्याचा कोलकाताचा प्रयत्न असेल.

हेही वाचा >>>‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

पावसाचा खोडा?

चेन्नईत होणाऱ्या अंतिम सामन्यात पाऊस खोडा घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मग सायंकाळी साधारण ५.४५ वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मैदानावर सराव करत असलेल्या कोलकाताच्या संघाला ‘ड्रेसिंग रूम’मध्ये परत जावे लागले. तसेच खेळपट्टी आणि आजूबाजूचा काही भागही आच्छादित करण्यात आला. आता रविवारी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे रविवारी खेळ न होऊ शकल्यास सोमवारचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ‘‘अंतिम सामन्यासाठी वापरण्यात येणारी खेळपट्टी लाल मातीची असणार आहे,’’ असे सामन्याच्या पूर्वसंध्येला कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला. अशा खेळपट्टीवर सहसा चेंडूला चांगली उसळी मिळते.

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा