आयपीएलचा यंदाचा हंगाम संपुष्टात आला आहे. आज (२६ मे) चेन्नई येथील चिन्नास्वामी मैदानावर आयपीएलचा अंतिम सामना केकेआर विरुद्ध एसआरएच या संघादरम्यान खेळला जाणार आहे. आयपीएलची सांगता होत असतानाच पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकाची चाहूल लागली आहे. भारतीय संघाच्या अंतिम १५ मधील अनेक खेळाडू पुढील आठवड्यात विश्वचषकासाठी रवाना होणार आहेत. मात्र भारताचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहली भारतीय संघाचा भाग असला तरी तो १ जून रोजी होणाऱ्या बांगलादेशविरोधातील सराव सामन्यात खेळू शकणार नाही. याचे कारण त्यानेच स्पष्ट केले आहे.

आयपीएलनंतर हवीये छोटीशी विश्रांती

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याही नियोजित वेळेपेक्षा उशीराने रवाना होणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंची पहिली तुकडी शनिवारी (दि. २५ मे) रवाना झाली. तर दुसरी तुकडी सोमवारी रवाना होणार आहे. संजू सॅमसनने दुबईत वैयक्तिक काम असल्याचे कारण देत बीसीसीआयकडून उशीरा युएसएला पोहोचण्याची परवानगी घेतली आहे. तर विराट कोहलीला आयपीएलनंतर छोटीशी विश्रांती हवी आहे. त्यामुळे त्याने उशीरा पोहोचण्याची विनंती केली.

विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीची कमाल दाखवत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यासह कोहलीने एकूण १५ सामने खेळले. या सामन्यात त्याने तब्बल ७४१ धावा केल्या. ज्यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीला राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे यंदाही आयपीएलच्या चषकावर नाव कोरण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.

बीसीसीआयने विराट कोहली, सॅमसन आणि हार्दिक पंड्या या तीनही क्रिकेटपटूंची विनंती मान्य केली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, विराट कोहलीने उशीरा सहभागी होण्याबाबत आधीच परवानगी मागितली होती. त्यामुळेच बीसीसीआयने त्याचा व्हिसा उशीराने केला आहे. ३० मे रोजी सकाळी तो न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघेल. बीसीसीआयने त्याची विनंती मान्य केली आहे.

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, कुलदीप यादव, शुबमन गिल, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि मदतनीस कर्मचारी हे शनिवारी रात्री न्यूयॉर्कसाठी निघाले आहेत. ५ जून रोजी भारतीय संघाचा आयर्लंडशी सामना होणार आहे. त्यानंतर ९ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भारताचा सामना होणार आहे.