Pat Cummins credits Daniel Vettori for SRH victory : सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव केला. या विजयानंतर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने अंतिम फेरी गाठली आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सचा प्रवास संपला आहे. मात्र, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने या विजयाचे श्रेय डॅनियल व्हिटोरीला दिले. कठीण परिस्थितीत डॅनियल व्हिटोरीच्या निर्णयाने खेळ कसा बदलला हे त्याने सांगितले. वास्तविक, मयंक मार्कंडेच्या आधी पॅट कमिन्सने गोलंदाजीची जबाबदारी शाहबाज अहमदकडे सोपवली होती, ज्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

डॅनियल व्हिटोरीच्या मास्टरस्ट्रोकमुळे हैदराबाद विजयी –

पॅट कमिन्सने सांगितले की, डॅनियल व्हिटोरीचा मास्टरस्ट्रोक म्हणजे मयंक मार्कंडेपुढे शाहबाज अहमदला गोलंदाजी करणे. या निर्णयाने खेळ पूर्णपणे बदलला. शाहबाज अहमदने ४ षटकात २३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि रवी अश्विनच्या विकेट्सचा समावेश होता. पॅट कमिन्स म्हणाला की, राजस्थान रॉयल्स संघात उजव्या हाताचे अनेक फलंदाज होते, त्यामुळेच आम्हाला डावखुऱ्या फिरकीपटूकडून गोलंदाजी करायची होती. दरम्यान, शाहबाज अहमद आमच्यासाठी एक महत्वाचा घटक म्हणून उदयास आला. या मास्टरस्ट्रोक मागे डॅनियल व्हिटोरीचे डोके असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

डॅनियल व्हिटोरीचा सल्ला ठरला मोलाचा –

सामन्यानंतर बोलताना पॅट कमिन्स म्हणाला, “आमच्या खेळाडूंनी संपूर्ण मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. तुम्ही बघू शकता, संघात खूप उत्साह आहे आणि हंगामाच्या सुरुवातीला अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य होते आणि आम्ही ते साध्य केले. आमची ताकद आमची फलंदाजी आहे हे आम्हाला माहीत होते आणि आम्ही या संघातील अनुभवाला कमी लेखणार नाही. मात्र, भुवी, नटराजन आणि उनाडकट यांच्यामुळे माझे काम सोपे होते. त्याचबरोबर डॅन व्हिटोरीने शाहबाजला प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळवण्याचा दिलेला सल्ला आमच्यासाठी मोलाचा ठरला.”

हेही वाचा – SRH vs RR : शिमरॉन हेटमायरला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने केली मोठी कारवाई

अभिषेक शर्माबद्दल बोलताना पॅट कमिन्स पुढे म्हणाला, “अभिषेकची गोलंदाजी आश्चर्यकारक होती, त्याने उजव्या हाताच्या काही फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न केला. त्याने मधल्या षटकात चांगली गोलंदाजी केली आणि दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. शाहबाजनेही मधल्या षटकांत गोलंदाजी करताना तीन विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे या दोन फिरकीपटूंनी आमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.”