ICC ODI rankings: आयसीसीने नुकतीच वनडेमधील नवी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत मोठा बदल पाहायला मिळाला. वय हा फक्त एक आकडा आहे हे क्रमवारी पाहून आपण म्हणू शकतो. आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत ३५ वर्षीय गोलंदाज पहिल्या स्थानी तर ३९ वर्षीय अष्टपैलू खेळाडू पहिल्या स्थानी आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधील संघांच्या क्रमवारीत ११व्या क्रमांकावर असलेल्या संघाचा खेळाडू जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. झिम्बाब्वे संघाच्या खेळाडूने वनडे क्रमवारीत अफगाणिस्तानच्या खेळाडूला मागे टाकत पहिलं स्थान गाठलं. भारताचा रवींद्र जडेजा वनडेमध्ये नवव्या स्थानी आहे. तर पाकिस्तानचा कोणताच खेळाडू टॉप-१० मध्येही नाही.
झिम्बाब्वेच्या टी-२० संघाचा कर्णधार सिकंदर रझा वनडेमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. सिंकदर रझा हा आता ३९ वर्षांचा आहे आणि या वयातही त्याने इतर खेळाडूंना मागे टाकत पहिल्या स्थानावर कब्जा केला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी अफगाणिस्तानचे खेळाडू आहेत. चौथ्या स्थानी बांगलादेशचा मेहदी हसन मिर्झा आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर-१ अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा हा झिम्बाब्वेच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत झिम्बाब्वेसाठी १५३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३६.९९ च्या सरासरीने ४४७६ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ शतकं आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ९४ विकेट्सही घेतल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा ३५ वर्षीय गोलंदाज नंबर वन वनडे गोलंदाज
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात आफ्रिकेने इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव केला. आफ्रिकेच्या संघाने वनडे सामन्यात इंग्लंडला १३१ धावांवर सर्वबाद केलं. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने ४ विकेट्स घेत इंग्लिश संघाचं कंबरडं मोडलं.
३५ वर्षीय फिरकीपटू केशव महाराजच्या या उत्कृष्ट कामगिरीचा त्याला वनडे क्रमवारीत मोठा फायदा झाला. केशव महाराज ६९० गुणांसह गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. यानंतर दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा महिश तीक्ष्णा आहे. तर तिसऱ्या स्थानी भारताचा कुलदीप यादव आहे. यानंतर नामिबिया संघाचा बेर्नार्ड स्कोल्टज आहे. तर पाचव्या स्थानी अफगाणिस्तानचा रशीद खान आहे.