मेलबर्न : पाकिस्तान आणि इंग्लंड संघांदरम्यान ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत रविवारी खेळवली जाणार आहे. मात्र मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या अंतिम लढतीवर पावसाचे सावट आहे. नियोजित दिवस आणि राखीव दिवशीही पावसामुळे खेळ झाला नाही, तर पाकिस्तान आणि इंग्लंडला संयुक्त विजेते घोषित केले जाईल.

अंतिम सामन्याच्या दिवशी रविवारी मेलबर्नमध्ये पावसाची ९५ टक्के शक्यता आहे. हवामान खात्याने साधारण २५ मिमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज केवळ रविवारसाठी नसून, सामना राखीव दिवशी खेळविण्याचा निर्णय झाल्यास, सोमवारीही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आयसीसीने घेतलेल्या निर्णयानुसार, पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास राखीव दिवसाचा पर्याय खुला आहे. अंतिम सामन्याचा निर्णय होण्यासाठी दोन्ही डावांत किमान १० षटकांचा खेळ होणे अनिवार्य आहे. आवश्यकता भासल्यास षटकांची संख्या कमी करून रविवारीच सामना संपविण्याकडे आयोजकांचा कल असल्याचे समजते. नियमानुसार

१० षटके झाली नसतील, तर सामना राखीव दिवशी खेळविला जाईल. दोन्ही दिवशी खेळ झाला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या स्पर्धेच्या ‘अव्वल १२’ फेरीतील मेलबर्नवरील तीन सामने पावसामुळे रद्द करावे लागले होते.