Hardik Pandya says IND vs PAK match is not a war : टी-२० विश्वचषकात २०२४ मध्ये ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. याआधी दोन्ही संघातील अनेक क्रिकेटपटू या सामन्याबाबत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत वक्तव्य केले आहे. हार्दिक म्हणाला की, पाकिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० विश्वचषक सामन्याकडे तो ‘युद्ध’ म्हणून पाहत नाही, पण भारतीय अष्टपैलू खेळाडू त्याच्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला तोंड देण्यासाठी उत्सुक आहे. पाकिस्तानविरुद्ध हार्दिकची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

रविवारी (९ जून) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल तेव्हा पंड्याला कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मागील यशाची पुनरावृत्ती करायची आहे. ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, “मोठ्या सामन्यांमध्ये खेळण्यासाठी मी उत्साही असतो. मला ते खूप खास वाटते आणि पाकिस्तान हा असा संघ आहे, ज्याविरुद्ध मी अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.” हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरुद्ध ६ टी-२० सामने खेळले असून ८४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ७.५ च्या इकॉनॉमी रेटने ११ विकेट्सही घेतल्या आहेत.

‘भारत-पाकिस्तान सामना म्हणजे युद्ध नाही…’ –

बीसीसीआयशी बोलताना हार्दिक पंड्याने सांगितले की, ‘हे युद्ध नाही, फक्त सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच रोमांचक असतात. तसेच भावनांचा महापूर उसळतो, परंतु मला आशा आहे की आम्ही शिस्तबद्ध कामगिरी करू आणि एक युनिट म्हणून आमचे ध्येय साध्य करू. आपण हे करू शकलो तर आणखी एक दिवस चांगला जाईल.” टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताला फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला आहे.

हेही वाचा – USA vs PAK : ‘एक ही दिल है कितनी बार तोड़ोगे…’, पाकिस्तानच्या पराभवानंतर संतापली चाहती, पीसीबीसह खेळाडूंनाही फटकारले, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने विजयाने तर पाकिस्तानची पराभवाने विश्वचषकाची सुरुवात –

भारताने टी-२० विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा पराभव करून विजयाची नोंद केली. त्याचवेळी अमेरिकेने पाकिस्तानचा सुपर ओव्हर्समध्ये धुव्वा उडवला. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेकडून ५ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना अमेरिकेने पहिल्यांदा सामना बरोबरीत सोडवला. मात्र नंतर सुपर ओव्हरमध्ये दमदार विजय मिळवला.