सुपर८ फेरीसाठी पात्र होताना दमछाक झालेल्या इंग्लंडने या फेरीत दाखल होताच यजमान वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना तब्बल ५१ निर्धाव चेंडू खेळले. वेस्ट इंडिजने दिलेलं १८० धावांचं लक्ष्य इंग्लंडने १५ चेंडू आणि ८ विकेट्स राखून पार केलं. इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्टने ४७ चेंडूत नाबाद ८७ धावांची खेळी करत या विजयाचा पाया रचला. सॉल्टच्या वादळी खेळीने वेस्ट इंडिजने खेळून काढलेल्या निर्धाव चेंडूंचे डावपेच निष्प्रभ ठरवले.

१८१ धावांचं आव्हानात्मक लक्ष्य मिळालेल्या इंग्लंडला कर्णधार जोस बटलर आणि फिल सॉल्ट यांनी ६७ धावांची खणखणीत सलामी दिली. रॉस्टन चेसने बटलरने पायचीत केलं. तो २२ चेंडूत २५ धावा करुन बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या मोईन अलीने १३ धावा केल्या आणि रसेलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. ८४/२ अशा स्थितीत बेअरस्टो सॉल्टला साथ देण्यासाठी मैदानात उतरला. धावगतीचं आव्हान वाढत होतं. पण या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूत ९७ धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजच्या आक्रमणातली हवाच काढून घेतली. १६व्या आणि रोमारिओ शेफर्डच्या दुसऱ्या षटकात सॉल्टने ३० धावा कुटल्या आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सॉल्टने या षटकात ४, ६, ४, ६, ,६, ,४ अशा पद्धतीने मनमुराद फटकेबाजी केली.

फिरकीपटू रॉस्टन चेस चांगली गोलंदाजी करत असताना कर्णधार पॉवेलने त्याला बाजूला करुन अल्झारी जोसेफला आणलं. सॉल्ट-बेअरस्टो जोडीने जोसेफच्या दुसऱ्या षटकात १४ धावा काढल्या. त्याच्या पुढच्या षटकात या जोडीने अकेल हुसेनच्या गोलंदाजीचा समाचार घेत १६ धावा कुटल्या. बेअरस्टोने २६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४८ धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या तुलनेत इंग्लंडने फक्त २९ निर्धाव चेंडू खेळले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. सेंट ल्युसियाच्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या गोलंदाजांची अतिशय विचारपूर्वक मारा केला. निर्धाव चेंडूंवर भर देत इंग्लंडने वेस्ट इंडिजच्या धडाकेबाज फलंदाजांना रोखलं. जॉन्सन चार्ल्ससारख्या तडाखेबंद खेळासाठी प्रसिद्ध फलंदाजांला इंग्लंडने जखडून ठेवलं. इंग्लंडने त्याला ३४ चेंडूत ३८धावाच करु दिल्या. ब्रँडन किंग २३ धावा करुन दुखापतग्रस्त होऊन तंबूत परतला.

मागच्या लढतीत ९८ धावांची खेळी करणाऱ्या निकोलस पूरनने ३२ चेंडूत ३६ धावा केल्या पण त्यालाही सूर गवसला नाही. कर्णधार रोव्हमन पॉवेलने १७ चेंडूत ५ षटकारांसह ३६ धावा केल्या. स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आंद्रे रसेल अवघी एक धाव करुन माघारी आला. शेरफन रुदरफोर्डने १५ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २८ धावांची खेळी केली. रुदरफोर्डच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने पावणेदोनशेचा टप्पा ओलांडला. वेस्ट इंडिजने विजयासाठी इंग्लंडसमोर १८१ धावांचं लक्ष्य ठेवलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडच्या गोलंदाजांपैकी जोफ्रा आर्चरने १२ तर आदिल रशीदने १० निर्धाव चेंडू टाकत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवरचं दडपण वाढवलं. सॅम करन (९), रीस टोपले (८) आणि मार्क वूड (७) यांनीही निर्धाव चेंडूवर भर देत मारा केला.