टी२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात आज (बुधवार) खेळला जात आहे. न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि शाहीन शाह आफ्रिदीने शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंडला पहिल्याच षटकात मोठा धक्का दिला. स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून न्यूझीलंड संघ आपण उपांत्य फेरीतील प्रबळ दावेदार असल्याचे दाखवत होता. मात्र पाकिस्तानने सामन्यात जीव फुंकत तो रंगतदार स्थितीत आणला.

शाहीन शाह आफ्रिदी हा पाठीच्या आणि घोट्याच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून जवळपास दोन- तीन महिने दूर होता. दुबईत पार पडलेल्या आशिया चषकात देखील तो खेळू शकला नव्हता. तो ज्यावेळी तंदुरस्त होऊन आला त्यावेळी त्याचा फॉर्म हा खराब आहे हे त्याच्या गोलंदाजीवरून दिसत होते. नेहमीच्या गोलंदाजीची लय त्याच्या गोलंदाजीत दिसत नव्हती. मात्र आजच्या टी२० विश्वचषकातील न्यूझीलंड विरुद्ध सुरु असणाऱ्या उपांत्यफेरीतील सामन्यात त्याने दोन गडी बाद करत न्यूझीलंड संघाला मोठे धक्के दिले. पहिल्याच षटकात फिन ऍलनला जबरदस्त चेंडूवर पायचीत करत पहिला धक्का दिला. तर केन विलियम्सनला ४६ धावांवर मोक्याच्या क्षणी त्रिफळाचीत करत मोठा ब्रेक थ्रू दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रथम फलंदाजी करताना खराब सुरूवातीनंतर डाव सावरत २० षटकात ४ बाद १५२ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने झुंजार अर्धशतक ठोकले. कर्णधार केन विलियम्सन व डेवॉन कॉनवे ही जोडी चतुराईने एकेक धाव घेत किवांचा डाव सावरताना दिसली, परंतु पॉवर प्लेच्या अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानने धक्का दिला. शादाब खानने अप्रतिम थ्रो करून कॉनवेला (२१) धावबाद केले. पहिल्या ६ षटकांत किवींनी २ बाद ३८ धावा केल्या. ग्लेन फिलिप्सही अपयशी ठरला. पहिल्या १० षटकांत पाकिस्तानचे वर्चस्व पाहायला मिळाले. कर्णधार केन व डॅरील मिचेल यांनी न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. १३व्या षटकात केनने खणखणीत षटकार मारून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. केन व मिचेल यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.