टी२० विश्वचषक २०२२ च्या तयारीत असलेला भारतीय संघ सराव सामना खेळण्यासाठी ब्रिस्बेनला पोहोचला आहे. यापूर्वी भारतीय संघ पर्थमध्ये सराव करत होता. यादरम्यान एका ११ वर्षाच्या मुलाने आपल्या गोलंदाजीने भारतीय कर्णधार रोहित शर्माला चकित केले. ११ वर्षीय द्राशिल चौहान पर्थमधील वाका मैदानावर सकाळच्या कार्यक्रमाचा भाग होता. भारतीय संघ दुपारच्या सरावासाठी दाखल झाला. टीम इंडियाच्या खेळाडूंना त्यांच्या ड्रेसिंग रूममधून सुमारे १०० लहान मुले क्रिकेट खेळताना दिसली आणि द्राशिलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याला भारतीय कर्णधार रोहित शर्माला गोलंदाजीची करण्याची संधी देण्यात आली.

द्राशिल हा क्षण नेहमी लक्षात ठेवेल. टीम इंडियाचे विश्लेषक हरी प्रसाद मोहन यांनी बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “आम्ही वाका येथे दुपारच्या सराव सत्रासाठी होतो आणि मुले त्यांचा सराव करत होती. आम्ही आमच्या ड्रेसिंग रूममधून १०० हून अधिक मुले क्रिकेट खेळताना पाहत होतो. त्या सर्व मुलांमधील द्राशिल नावाच्या मुलाने आम्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतले, विशेषतः रोहितला, त्याची गोलंदाजी पाहून खूपच आश्चर्य वाटले. त्याच्यात खूप चांगली प्रतिभा आहे आणि तो सतत फलंदाजांना चकवा देत होता. हे पाहून नेटमध्ये काही चेंडू खेळण्यासाठी रोहित त्याच्याकडे गेला. ते एक अद्भुत दृश्य होते.”

तो ज्या शिताफीने गोलंदाजी करत होता, ते पाहण्याजोगं होतं. त्यामुळे थेट द्राशिलला रोहितनं बोलवून घेतलं आणि नेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी दिली. टीम इंडियाची ड्रेसिंग रुमही दाखवली तसंच त्याला ऑटोग्राफही दिला. इंडियन एक्स्प्रेस वृत्तानुसार, रोहित द्राशिलच्या गोलंदाजीने इतका प्रभावित झाला की त्याने त्या लहान मुलाला संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये घेऊन गेला, जिथे त्याने जगातील मोठ्या क्रिकेट स्टार्ससोबत काही क्षण शेअर केले.

रोहित शर्माला आपल्या गोलंदाजीने प्रभावित करणारा द्राशिल चौहान म्हणाला की, “मला क्रिकेटर व्हायचे आहे. द्राशिलने खुलासा केला की त्याच्या आवडत्या चेंडूंपैकी एक इनस्विंग यॉर्कर आहे. त्याला आउटस्विंग गोलंदाजी करायलाही आवडते.” रोहितने त्याच्या जर्सीवर ऑटोग्राफ आणि एक संदेश देऊन द्राशिलचा दिवस आणखी संस्मरणीय बनवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडिया १९ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. २३ ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध त्यांच्या टी२० विश्वचषकाची मोहीम सुरू होईल. एमसीजीमध्ये २३ ऑक्टोबरच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर, भारत २७ ऑक्टोबरला सिडनीमध्ये पात्रता संघाशी, ३० ऑक्टोबरला पर्थमध्ये दक्षिण आफ्रिका, २ नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये बांगलादेश आणि ६ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये पात्रता संघाशी सामना खेळेल.