गुवाहाटी : ‘आयसीसी’ जेतेपदाची प्रतीक्षा संपविण्यास उत्सुक असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सलामीची लढत उद्या, शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, पण त्यांना अद्याप जेतेपद मिळवता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेने गेल्या दोन एकदिवसीय विश्वचषकांची उपांत्य फेरी गाठली होती, तर गेल्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषकांत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदा अंतिम अडथळा पार करण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ चांगल्या लयीतही आहे. त्यांनी अलीकडच्या काळातच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांसारख्या संघांवर विजय मिळवले आहेत. त्यामुळे हा संघ पूर्ण आत्मविश्वासानिशीच मैदानावर उतरेल. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची भिस्त लॉरा वोल्वार्ड आणि तझ्मिन ब्रिट्स यांच्यावर असेल. मारिझान कापचे अष्टपैलू योगदान त्यांच्यासाठी निर्णायक ठरू शकेल. यंदाची विश्वचषक स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होत असून येथील खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल मानल्या जातात. दक्षिण आफ्रिकेच्या संघात नामांकित फिरकीपटू नाही. याचा त्यांना फटका बसू शकेल.
दुसरीकडे, इंग्लंड महिला संघ सध्या संक्रमणातून जात असून अलीकडच्या काळातील त्यांची कामगिरीही फारशी उल्लेखनीय नाही. त्यांना मायदेशात भारताकडून एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत हार पत्करावी लागली होती. इंग्लंडचा संघ सध्या कर्णधार नॅट स्किव्हर-ब्रंट हिच्यावर अतिअवलंबून असल्याचे दिसून आले आहे. अष्टपैलू स्किव्हर-ब्रंटला अन्य खेळाडूंची साथ मिळाली, तरच इंग्लंडचा या स्पर्धेत यश मिळवता येऊ शकेल. इंग्लंडसाठी एक जमेची बाजू म्हणजे विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, चार्ली डीन आणि लिन्से स्मिथ यांच्या रूपात गुणवान फिरकी गोलंदाज त्यांच्या संघात आहेत. त्यांनी लौकिकाला साजेशी कामगिरी केल्यास इंग्लंडचा संघ प्रतिस्पर्ध्यांसमोर अडचणी निर्माण करू शकेल.
वेळ : दुपारी ३ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.