मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघाने २०११ साली मायदेशात झालेला एकदिवसीय विश्वचषक जिंकला, तेव्हा मी जेमतेम ११ वर्षांची होते. मात्र, भारताचे जेतेपद निश्चित झाल्यानंतर चाहत्यांनी रस्त्यांवर उतरून केलेला जल्लोष माझ्या कायमचा लक्षात राहिला. चाहत्यांचे हे प्रेम पाहून आपल्यालाही एकेदिवशी विश्वचषक जिंकायचा आहे असे स्वप्न पाहू लागले. आता ती संधी चालून आली आहे. आम्ही घरच्या प्रेक्षकांसमोर सर्वोत्तम कामगिरी करून विश्वचषक जेतेपदाची प्रतीक्षा संपविण्याचा नक्कीच प्रयत्न करू, अशी भावना महिला संघाची मुंबईकर फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने व्यक्त केली.
भारत आणि श्रीलंका येथे यंदा ३० सप्टेंबरपासून महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. विश्वचषकाचे अनावरण, तसेच स्पर्धेला ५० दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याच्या निमित्ताने सोमवारी मुंबईत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मनधाना, माजी कर्णधार मिताली राज, पुरुष संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग, तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष जय शहा, नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते.
सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न
भारतीय महिला संघाने २००५ आणि २०१७ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, दोन्ही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आता घरच्या मैदानांवर खेळताना ऐतिहासिक जेतेपदावर मोहोर उमटविण्याचा निर्धार कर्णधार हरमनप्रीतने व्यक्त केला. ‘‘आम्हाला यावेळी अंतिम अडथळा पार करायचा आहे. याची आमच्यासह सर्वच देशवासीय वाट बघत आहेत. विश्वचषक स्पर्धा खूपच खास असतात. त्यातच ही स्पर्धा मायदेशात खेळण्यापेक्षा मोठे काहीच नाही. यात देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल. युवी दादाला (युवराज सिंग) मी भारताला विश्वचषक जिंकवून देताना पाहिले आहे. त्याची कामगिरी खूप प्रेरणादायी असून मलाही असेच काही करायला आवडेल,’’ असे हरमनप्रीतने नमूद केले.
सकारात्मक वातावरण
भारतीय महिला संघाने नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय अशा दोनही मालिका जिंकण्याची चमकदार कामगिरी केली. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला असून विश्वचषकासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज असू, असे भारताची प्रमुख फलंदाज मनधानाने सांगितले. ‘‘संघातील वातावरण अतिशय सकारात्मक आहे. खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी ही गोष्टही महत्त्वाची ठरते. विशेषत: इंग्लंडमध्ये आम्ही क्षेत्ररक्षणात दाखवलेली सुधारणा लक्षवेधी होती. आता आगामी सामन्यांतही अशीच कामगिरी सुरू ठेवली आणि केवळ सर्वोत्तम खेळ करण्यावर लक्ष केंद्रित केले, तर यश आपोआपच मिळेल,’’ असे विश्वास मनधानाने व्यक्त केला.
दरम्यान, गेल्या एक-दोन वर्षांत खेळाडूंची मानसिकता आणि सामन्यांसाठीची तयारी यात बराच बदल झाला असून याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचेही मत जेमिमा आणि मनधानाने मांडले.
२०१७ विश्वचषकाने महिला क्रिकेटला कलाटणी
– भारतीय महिला संघाला २०१७ साली इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या कामगिरीमुळे, तसेच अंतिम लढतीत यजमान इंग्लंडला अखेरपर्यंत दिलेल्या झुंजीमुळे देशवासीयांचा महिला क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, असे भारतीय खेळाडूंना वाटते.
– ‘‘महिला क्रिकेट आता प्रगतीपथावर आहे. देशातील महिला क्रिकेटमध्ये गेल्या आठ वर्षांत मोठा बदल पाहायला मिळाला आहे. महिला क्रिकेटच्या प्रसार आणि प्रगतीचा भाग असल्याचा खूप आनंद आहे,’’ असे मनधाना म्हणाली. तसेच माजी कर्णधार मिताली राजनेही अशीच भावना व्यक्त केली.
– ‘‘२०१७ विश्वचषकानंतर केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावर महिला क्रिकेटला कलाटणी मिळाली. समाजमाध्यमांवरही महिला क्रिकेटची चर्चा केली जाऊ लागली. प्रसारणकर्त्यांचाही रस वाढला. ‘आयसीसी’नेही ठोस पावले उचलत महिला क्रिकेटसाठी विविध उपक्रम राबविले. त्यामुळेच ही प्रगती दिसून येत आहे,’’ असे मिताली म्हणाली.
इंग्लंडमध्ये २०१७ साली झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळी मी १६ वर्षांची होते. त्यानंतर संघ मायदेशात परतला, तेव्हा मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) आम्हाला त्यांच्या स्वागतासाठी पाठवले. भारतीय संघ अंतिम फेरीत पराभूत झाल्याने त्यांच्या स्वागतासाठी कोणीही येणार नाही असे त्यांना वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात पहाटे ५.३० वाजताही विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. संघातील खेळाडूंनाही याचे आश्चर्य वाटले होते. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने देशातील महिला क्रिकेटला कलाटणी देणारी ठरली. – जेमिमा रॉड्रिग्ज