Imran Tahir Record In T20 Cricket: दक्षिण आफ्रिकचा माजी गोलंदाज इमरान ताहीरने वयाची ४६ वर्ष पूर्ण केली आहेत. मात्र क्रिकेटच्या मैदानावर अजूनही त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत तो गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाचं नेतृत्व करत आहे. या संघाकडून गोलंदाजी करताना त्याने विरोधी संघातील फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आणि ५ गडी बाद केले. त्याने गोलंदाजी करताना ४ षटकात अवघ्या २१ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. यादरम्यान त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात दिग्गज फलंदाजांना अडकवणारा इमरान ताहीरने टी-२० क्रिकेटमध्ये (Imran Tahir Record) मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. इमरान ताहीर हा टी -२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना ५ गडी बाद करणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. इमरान ताहीरने वयाच्या ४६ व्या वर्षी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यासह त्याने मलावी संघाचा कर्णधार मोअज्जम अली बेगचा विक्रम मोडून काढला आहे.

ताहीरने टी -२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना ५ गडी बाद करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने ५ वेळा असा पराक्रम केला आहे. यासह टी -२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना तो सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या मोठ्या विक्रमात त्याने दिग्गज खेळाडूंची बरोबरी केली आहे.

टी -२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना लसिथ मलिंगा, शाकिब अल हसन आणि शाहीन आफ्रिदी यांच्या नावे देखील ५ गडी बाद करण्याची नोंद आहे. आता या यादीत इमरान ताहीरचं नाव देखील जोडलं गेलं आहे. या सामन्यात गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाने ८२ धावांनी विजयाची नोंद केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाने २० षटकांअखेर ३ गडी बाद २११ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अँटिग्वा अँड बारबुडा फाल्कन्स संघाचा डाव अवघ्या १२८ धावांवर आटोपला.