WTC 2023 Final India vs Australia: इंग्लंडमधील ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलच्या तिसऱ्या दिवशी एक विचित्र घटना पाहायला मिळाली. त्यामुळे भर मैदानात कांगारूंचा पचका झाला. कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर मोहम्मद सिराजला बाद देण्यात आले. त्यावर टीम इंडियाने रिव्ह्यू घेतला. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी रिव्ह्यू न पाहता मैदान सोडले, पण पंचांनी मोहम्मद सिराजला नाबाद घोषित केल्यावर त्यांना सीमारेषेवरून परतावे लागले. हे दृश्य ६९ व्या षटकात दिसले. रिव्ह्यू न पाहताच मैदानावरून ऑस्ट्रेलियाचा संघ परतला ६९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कॅमेरून ग्रीनने शार्दूलला बाद केले होते. यानंतर स्ट्राईकवर आलेल्या सिराजला पाचव्या चेंडूवर ग्रीनने शानदार यॉर्कर टाकला, त्यावर सिराजला बाद ठरवण्यात आले. अंपायरने त्याला आउट दिल्यावर सिराजने लगेच रिव्ह्यू घेतला. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सिराजने घेतलेला तो रिव्ह्यू पाहण्याचे कष्ट देखील घेतले नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडू रिव्ह्यू न पाहताच एक एक करून मैदानातून परतले. डीआरएस घेतल्यानंतर तिसऱ्या पंचाच्या निर्णयात चेंडू सिराजच्या बॅटला लागल्याचे अल्ट्राएजमध्ये स्पष्टपणे दिसून आले. अशा परिस्थितीत पंचांना नॉट आऊट घोषित करावे लागले. यानंतर सीमारेषेवर पोहोचलेले खेळाडू लगेच परतले. मात्र, मिचेल स्टार्कने पुढच्याच षटकात मोहम्मद शमीला बाद करत भारतीय डाव गुंडाळला. सामन्याच्या धावसंख्येबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडिया पहिल्या डावात २९६ धावांवर बाद झाली. यासह ऑस्ट्रेलियाला १७३ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर अवघी १ धाव काढून बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला के.एस. भरतकडे झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर उमेशने उस्मान ख्वाजाला १३ धावांवर घरचा रस्ता दाखवला. हेही वाचा: WTC Final IND vs AUS: रहाणेच्या खेळीनंतरही टीम इंडिया बॅकफुटवर, तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया २९६ धावांनी आघाडीवर पहिल्या डावात शतक झळकावणारे ऑस्ट्रेलियाचे दोन्ही खंदे फलंदाजही दुसऱ्या डावात फारशी चमक दाखवू शकले नाही. स्टीव स्मिथ ३४ धावा काढून तर हेड केवळ १८ धावा करून बाद झाले. दोघांना सर जडेजाने बाद केले. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्स गमावत १२३ धावा केल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे २९६ धावांची आघाडी आहे. चौथ्या दिवशी भारताला विकेट्सची गरज आहे त्यामुळे आता उद्या टीम इंडियाची काय रणनीती असेल याकडे सर्वांचे लक्ष असेल.