बहुप्रतिक्षित असेलल्या भारतातील पहिल्या महिला आयपीएलसाठी आज मुंबईत लिलाव पार पडला. यावेळी बीसीसीआयने नवीन पाच फ्रेंचायझीची घोषणा केली. या लिलावात पाच संघ खरेदी करण्यासाठी एकूण १७ कंपन्यांनी बोली लावली होती. दरम्यान, यावेळी पुरुषांच्या पहिल्या आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे. तसेच भारतीय महिला क्रिकेटसाठी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले जय शाह?
”आजचा दिवस भारतीय महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस आहे. कारण आज महिला आयपीएलच्या पहिल्या सीजनसाठी लिलाव पार पडला. या लिलावाने पहिल्या पुरुष आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत”, अशी प्रतिक्रिया जय शाह यांनी दिली. तसेच या लिलावाद्वारे बीसीसीआयला ४६६९.९९ कोटी रुपये मिळाले असल्याचेही ते म्हणाले.
बीसीसीआयकडून नवीन पाच फ्रँचायझींची घोषणा
दरम्यान, पहिल्या महिला आयपीएलसाठी बीसीसीआयकडून पाच संघांसाठी फ्रेंचायझींची घोषणा करण्यात आली. यावेळी अहमदाबाद संघासाठी अदानी स्पोर्ट्सलाइनने यशस्वी बोली लावली. त्यांनी अहमदाबाद संघ विकत घेण्यासाठी तब्बल १२८९ कोटी रुपये मोजले. तर मुंबई संघासाठी इंडियाविन स्पोर्टस् ने ९१२.९९ कोटी रुपये, बंगळुरू संघासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटी रुपये, दिल्ली संघासाठी जेएस डब्लू जीएमआर क्रिकेट लि.ने ८१० कोटी रुपये, तर लखनऊ संघासाठी कॅपरी ग्लोबल होल्डिंगने ७५७ कोटी रुपये मोजले.
या कंपन्यांचा लिलावात होता सहभाग
सुरुवातीला, ३३ कंपन्यांनी महिला आयपीएलमध्ये फ्रँचायझी खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले होते आणि निविदा कागदपत्रे खरेदी केली होती. मात्र, यापैकी केवळ १७ पक्षांनी तांत्रिक बोलीसाठी आपली कागदपत्रे सादर केली. यामध्ये सात आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांचा समावेश होता. यापैकी फक्त तिघांनाच महिला आयपीएल फ्रँचायझी मिळाली. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या मालकांनी महिला आयपीएलमध्ये संघ खरेदी करण्यात रस दाखवला आहे. यापैकी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूच्या मालकांना संघ खरेदी करण्यात यश आले.