२०१५ च्या विश्वचषकाची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. संपूर्ण स्पर्धेत ४६३ षटकार ,२१७० चौकार बदडले गेले. सरासरी प्रत्येक सामन्यात ४९० धावा झाल्या. हे सर्व आकडे मागील स्पर्धांपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी जास्त आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर प्रेक्षकांना एका ५० षटकाच्या सामन्यात दोन टी-२० सामन्यांचा धडाका पहायला मिळाला. जास्तीत जास्त मनोरंजन व्हावे म्हणून फलंदाज नामक वाघाला सर्वशक्तिशाली बनवण्यात आले. मशीनवर बनवण्यात आलेल्या जाडजूड बॅट ,जवळच्या सीमारेषा, कुठेही मारा मैदान मोकळे असले फलंदाजधार्जीणे क्षेत्ररक्षणाचे नियम आणि बरचं काही. फलंदाज बॅटच्या उलटया बाजूने मारताना दिसले (स्विच हिट नाही. बॅटची उलटी बाजू) स्टंप तर इतके टणक जमिनीत रुतवले जातात की, चेंडू लागला तरी बेल्स पडत नाहीत. वास्तविक स्टंप म्हणजे फलंदाजाचे चारित्र्य. त्याला चेंडू लागला की बेल्स पडून फलंदाजाचा न्यायनिवाडा व्हायला हवा. पण आताच्या बेल्ससुद्धाही भारतीय न्यायव्यवस्थेसारख्या निर्णयच देत नाहीत आणि शीलावर शिंतोडे उडूनसुद्धा फलंदाज निर्लज्ज राजकारण्यासारखा टिकून राहतो.
आता बिचाऱ्या गोलंदाजाची दुर्दशा पहा. दोन नवीन चेंडू असूनसुद्धा फार स्विंग न होणारे, खेळपट्टीवर गवत नाही ना टर्न नाही, दोन नवीन चेंडू असल्याने रिव्हर्स स्विंग नाही, मर्यादित बाऊन्सर, नो बॉलला फ्री हिट. म्हणजे गोलंदाज नामक गलितगात्र हरणाच्या मागे लागलेला चौसष्ट दातांचा आणि सहा पायाचा वाघ म्हणजेच हा फलंदाज.
टेनिसमध्येसुद्धा हे बाहुबल शिरले जेव्हा लाकडी रॅकेटची जागा धातुच्या रॅकेट्सने घेतली. प्रचंड वेगाची सर्व्हिस आणि बेसलाइन वरुन होणारे फोरहॅण्डचे घणाघात. इतका एकसुरी आणि कंटाळवाणा खेळ झाला की, १९९५ साली विम्बल्डनमध्ये खास कमी उडणारे चेंडू घेतले गेले.
हॉकीसारख्या सुंदर खेळात लांब लांब फ्री हिट्स मारून पास देणे आणि पेनल्टी कॉर्नर एक्सपर्ट नामक बाहुबलीने गोल करणे हे ‘टोटल हॉकी’ या थिअरीखाली सुरु झाले.
या सगळ्या गोष्टींवरुन असं दिसतय की, खेळ हे असे युद्ध आहे ज्याला शक्तीशिवाय पर्याय नाही असा समज रूढ झालाय. जे फक्त वीस टक्के खरे आहे. खेळ म्हणजे कलात्मकता ,शैली ,युक्ति,एकाग्रता, चिकाटी आणि शक्ती या सर्व गुणांचा इंद्रधनुष्य. क्रिकेट हे गाणं असेल तर स्ट्रेट ड्राइव्ह त्याचा प्राण स्वर आहे. प्रत्येक चेंडू डोक्यावरुन मारणारा खेळाडू फार काळ टिकू शकत नाही. स्ट्रेट ड्राइव्ह, फ्लिक, लेटकट, कवर ड्राईव्ह हे क्रिकेटचे मेरुमणी आहेत. नुसत्या ताना मारणारा गवई क्षणभर दीपवून टाकतो पण हळू हळू लक्षात येते की हे गाणं नाही. यात फक्त अॅटमबॉम्बचा आवाज आहे, फुलबाजीचा दीर्घकाळ टिकणारा आनंद नाही. गावस्कर, विश्वनाथ, हार्वे, गॉवर, सचिन, व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्या खेळी म्हणूनच परत परत बघाव्याशा वाटतात. शक्तीप्रयोग करणारे आजकालचे फलंदाज आजकालच्या हिंदी गाण्यासारखे फक्त काही दिवस लक्षात राहतात.
टेनिसमध्येही खरा आनंद टच प्लेयर्सनी दिला आहे. आपला रमेश कृष्णन आणि स्लोव्हाकियाचा मिलोस्लाव मेचिर हे ‘ग्रेटेस्ट टच प्लेयर्स’ होते. त्यांनी टेनिस रम्य बनवले. बोर्ग, मॅकेन्रो, कॉनर्स, आगासी ,सॅम्प्रस, फेडरर यांनी कलात्मकता आणि शैलीने जे नेत्रसुख दिले त्याबद्दल आपण त्यांचे कायम ऋणी राहू.
हॉकीमध्येसुद्धा ड्रिब्लिंगच्या शहेनशाह लोकांनी खेळाचा खरा आनंद दिला. पाकिस्तानचा हसन सरदार, ऑस्ट्रेलियाचे चार्ल्स वर्थ , हॅगर, वॉल्श, भारताचे मोहम्मद शहीद, जफर इकबाल, धनराज पिल्ले, कौशिक, परगट सिंह यांनी डोळ्यांचे पारणं फेडलं.
तात्पर्य असे की, खेळात सर्व गुणांचा उत्कर्ष व्हावा आणि त्याची अभिव्यक्ति व्हावी. खेळ हा मनोहर अनुभव असावा. शक्तीला महत्व आहे, पण शक्तीने इतर गुणांवर प्रहार करू नयेत. आपल्यासारख्या क्रीडा रसिकांनी रसिकतेची साधना वाढवून जे अस्सल आहे फक्त त्याचीच कास धरावी, म्हणजे ताकदीचा राक्षस आपल्या सुंदर खेळांना भस्मसात करणार नाही.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)