KL Rahul- Sai Sudarshan Century: ऑस्ट्रेलियाचा अ संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये अनऑफिशियल कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने भारतीय अ संघासमोर विजयासाठी ४१२ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी दमदार सुरूवात केली आहे. राहुलने १३६ व्या चेंडूवर चौकार मारून आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने १२ चौकार मारले.
केएल राहुल डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आला. ४४२ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. सलामीला आलेला नारायण जगदीशन अवघ्या ३६ धावांवर माघारी परतला. पण केएल राहुलने एक बाजू धरून ठेवली होती. केएल राहुलने साई सुदर्शनसोबत मिळून महत्वाची भागीदारी केली. साई सुदर्शन शतकी खेळी करून माघारी परतला. तर केएल राहुलने शतक झळकावून अजूनही एक बाजू धरून ठेवली आहे. भारतीय अ संघाने ७३ षटकांअखेर ४ गडी बाद २८२ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला अजूनही १३० धावांची गरज आहे.
येत्या २ ऑक्टोबरपासून भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात केएल राहुल आणि साई सुदर्शन या दोघांनाही संधी देण्यात आली आहे. दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये असणं ही भारतीय संघासाठी समाधानकारक बाब आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय अ संघाचा डाव अवघ्या १९४ धावांवर आटोपला होता.
पहिल्या डावात ४२० धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलिया अ संघाने दुसरा डाव १८५ धावांवर घोषित केला. यासह भारतीय संघासमोर विजयासाठी ४१२ धावांचं आव्हान ठेवलं. भारतीय संघाचा पहिला डाव स्वस्तात आटोपला होता. त्यामुळे दुसऱ्या डावातही भारतीय संघ फ्लॉप ठरतील, असा विचार करून ऑस्ट्रेलिया अ संघाने डाव लवकर घोषित केला. पण भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा हा डाव हाणून पाडला. जर केएल राहुल आणखी एक सेशन असाच खेळत राहिला, तर भारतीय संघ या सामन्यात सहज विजय मिळवू शकतो.