Indian Team Creates History at Edgbaston: नवख्या भारतीय संघाने इंग्लंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारतीय संघाने इंग्लंडविरूद्ध बर्मिंगहममध्ये ५८ वर्षांत पहिला विजय मिळवला आहे. कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने अनोखा विक्रमी विजय आपल्या नावे केला. भारताने इंग्लंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर तब्बल ३३६ धावांनी सर्वात मोठा पराभव केला आहे. शुबमन गिलने एका सामन्यात ४३० धावा केल्या, तर आकाशदीपने एका सामन्यात १० विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. तर मोहम्मद सिराजने ७ विकेट्स घेतले.

भारताने इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचं डोंगराएवढं मोठं आव्हान दिलं होतं. इंग्लंडचा संघ प्रत्युत्तरात मात्र २७१ धावांवर सर्वबाद झाला. यासह भारताने तब्बल ३३६ धावांनी विक्रमी विजयाची नोंद केली. यासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. तर भारताचा नवखा कर्णधार म्हणून शुबमन गिलचा हा पहिलाच कसोटी विजय आहे. गिलच्या नेतृत्त्वाखाली संघाने फक्त विजय नाही तर ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.

भारताने भेदलं बर्मिंगहमचं चक्रव्यूह

टीम इंडियाने १९६७ मध्ये बर्मिंगहममधील एजबॅस्टन मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला होता, परंतु त्यानंतर २०२५ मध्ये झालेल्या या सामन्यापर्यंत संघाला एकही सामना जिंकता आला नव्हता. या मैदानावर खेळलेल्या ८ पैकी ७ सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता, तर १९८६ मध्ये एक कसोटी अनिर्णित राहिली होती. मोठे स्टार खेळाडू, दिग्गज आणि उत्कृष्ट कर्णधार असूनही, टीम इंडिया एजबॅस्टनचं चक्रव्यूह कधी भेदू शकली नव्हती. पण नवीन कर्णधार शुबमन गिल आणि अनेक स्टार्सशिवाय या सामन्यात उतरलेल्या टीम इंडियाने अखेर ही आश्चर्यकारक कामगिरी केली.

भारताचा पहिला डाव

इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्याची नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजीसाठी उतरावं लागलं. भारताने पहिल्या डावात फलंदाजी करताना ५८७ धावांचा मोठा डोंगर उभारला, यामध्ये गिलच्या धावांचं सर्वात मोठं योगदान होतं. पहिल्या डावात राहुल लवकर बाद झाला, पण यशस्वी जैस्वालने कमालीची खेळी केली. यशस्वी जैस्वालने १०७ चेंडूत १३ चौकारांसह ८७ धावांची खेळी केली. तर करूण नायर ३१ धावा करत बाद झाला होता.

शुबमन गिलने ऐतिहासिक खेळी खेळत अनेक विक्रम मोडत ते आपल्या नावे केले आहेत. शुबमन गिलने ३८७ चेंडूत ३० चौकार आणि ३ षटकारांसह २६९ धावांची तुफानी खेळी केली. यानंतर रवींद्र जडेजाने ८९ धावांची खेळी करत जडेजाबरोबर २०० धावांची भागीदारी रचत मोठ्या धावसंख्या रचली. पहिल्या डावात इंग्लंडकडून शोएब बशीरने ३ विकेट्स, ख्रिस वोक्स, जोश टंग यांनी २-२ विकेट्स घेतसल्या. तर ब्रायडन कार्स, स्टोक्स आणि रूट यांनी १-१ विकेट घेतली.

इंग्लंडचा पहिला डाव

इंग्लंडच्या संघाने प्रत्युत्तरात ४०७ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून पहिल्या डावात आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांनी त्यांच्या षटकांत दोन चेंडूत दोन दोन विकेट घेत इंग्लंडला धक्के दिले. पण हॅरी ब्रूक आणि जॅमी स्मिथ यांनी ३०३ धावांची विक्रमी भागीदारी रचली. तर ब्रूकने २३४ चेंडूत १७ चौकार आणि एका षटकारासह १५८ धावा केल्या. तर जेमी स्मिथ २०७ चेंडूत २१ चौकार आणि ४ षटकारांसह १८४ धावा करत नाबाद परतला. सिराजने पहिल्या डावात ६ विकेट्स घेत त्यापैकी ४ फलंदाजांना खातंही उघडू दिलं नाही. तर आकाशदीपने ४ विकेट्स घेतले त्यापैकी २ फलंदाजांना खातंही उघडू दिलं नाही.

भारताचा दुसरा डाव

इंग्लंडला ४०७ धावांवर ऑलआऊट करत भारताने १८० धावांची मोठी आघाडी मिळवली. यासह भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४२२ धावा करत डाव घोषित केला. दुसऱ्या डावात केएल राहुलने ५५ धावा केल्या. तर शुबमन गिलने १६२ चेंडूत १३ चौकार ८ षटकार लगावत १६१ धावांची अजून एक विक्रमी खेळी केली. तर ऋषभ पंतने वनडे स्टाईल खेळी खेळत ५८ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ६ धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने ६९ धावांची शानदार खेळी केली.

इंग्लंडचा दुसरा डाव

भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी १८० अधिक ४२२ सह ६०८ धावांचं आव्हान दिलं आहे. भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिलं नाही. भारताने ७० षटकांतच इंग्लंडला ऑल आऊट केलं. भारताच्या आकाशदीप आणि सिराजने इंग्लंडच्या टॉप फलंदाजी फळीला ३० धावाही करू दिल्या नाही आणि बाद केलं. आकाशदीपने ४ टॉप फलंदाजांना बाद केलं. इग्लंडकडून फक्त जेमी स्मिथ ८८ धावांची खेळी करू शकला. तर ब्रायडन कार्स ३८ धावा करू शकला. याशिवाय सर्व फलंदाज २५ धावांच्या आत बाद झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकाशदीपने दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतले. तर सिराज, प्रसिध, जडेजा, सुंदर यांनी १-१ विकेट घेतली. आकाशदीपने एका सामन्यात १० विकेट्स घेतले. इंग्लंडमध्ये एका सामन्यात १० विकेट्स घेत उत्कृष्ट आकडा नोंदवणारा तो पहिला भारतीय गोलंदाज नोंदवला आहे.