आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत- पाकिस्तान संघांमध्ये वादाची ठिणगी पडलेली असतानाच याचं लोण फुटबॉलच्या मैदानावर पाहायला मिळालं. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर काही तासात सॅफ U17 फुटबॉल लढतीत भारत आणि पाकिस्तानचे संघ श्रीलंकेत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. ब गटाच्या या लढतीद्वारे गटात अव्वल कोण याचा फैसला होणार होता. मध्यंतराला पाकिस्तानचा स्ट्रायकर मुहम्मद अब्दुल्ला याने केलेलं सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
मुहम्मदने भारताच्या गोलकीपरला चकवत गोल केला. गोलचा आनंद व्यक्त करण्यासाठी मुहम्मद मैदानाच्या एका कोपऱ्यात गेला. त्याने सहकाऱ्यांबरोबर चहा पितोय अशा आविभार्वात गोलचा आनंद साजरा केला. आनंद साजरा करण्याच्या या पद्धतीत वेगळं असं काही नव्हतं पण काही तासातच हे सेलिब्रेशन आणि भारत-पाकिस्तान इतिहासातली एका घटना यांचं साधर्म्य स्पष्ट झालं.
२०१९ मध्ये भारताचे पायलट अभिनंदन वर्तमान यांना पाकिस्तानने पकडलं होतं. त्यानंतर काही दिवसात एक व्हीडिओ रीलिज करण्यात आला होता. पायलट अभिनंदन हे चहा पीत आहेत, त्यांची चांगली व्यवस्था करण्यात आली आहे हे दाखवणारा तो व्हीडिओ आहे. या प्रसंगाची आठवण मुहम्मदने करून दिली अशी सोशल मीडियावर चर्चा आहे.
मुहम्मदने त्यानंतर गोलचा आनंद व्यक्त करताना भारताची विमानं पाडत असल्याची खूण केली. पाकिस्तानचा क्रिकेटपटू हारिस रौफनेही भारताविरुद्धच्या लढतीत अशाच पद्धतीने हातवारे केले होते. पाकिस्तानने सहा भारतीय जेट विमानं पाडली होती.मुहम्मद आणि हारिस यांच्या सेलिब्रेशनमागे हा संदर्भ होता.
दरम्यान या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ३-२ असा विजय मिळवला. मध्यंतराला भारताकडे २-१ अशी आघाडी होती. पाकिस्तानने २-२ अशी बरोबरी साधली. पण ७४व्या मिनिटाला राहन अहमदच्या गोलच्या बळावर भारताने ३-२ अशी सरशी साधली. या विजयासह भारतीय संघाचे ९ गुण झाले आणि त्यांनी गटात अव्वल स्थान पटकावलं. सेमी फायनलच्या लढतीत भारताचा नेपाळशी मुकाबला होणार आहे.
क्रिकेटच्या मैदानावर काय काय घडलं?
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्याची पाळंमुळं पाकिस्तानात असल्याचं स्पष्ट झालं. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीम हाती घेत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धस्त केले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानशी व्यापार थांबवला. पाणीपुरवठाही बंद केला. या पार्श्वभूमीवर आशिया चषकात हे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळणार का याविषयी साशंकता होती. मात्र केंद्र सरकारने जारी केलेल्या धोरणामुळे हे सामने होणार हे स्पष्ट झालं. आयसीसी तसंच आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित मालिकांमध्ये भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार मात्र द्विराष्ट्रीय मालिका होणार नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं. दरम्यान पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्याच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. या सामन्यावर बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी झाली. अखेर मागच्या आठवड्यात पहिला सामना झाला. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघाशी हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यानंतरही भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी, सपोर्ट स्टाफशी हस्तांदोलन टाळलं. यावरून भडकलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया चषकातील उर्वरित सामन्यांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. मात्र आर्थिक नुकसान लक्षात घेऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळण्याचा निर्णय घेतला. वाटाघाटींमध्ये वेळ गेल्यामुळे युएईविरुद्धचा सामना तासभर उशिराने सुरू झाला.
रविवारी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत खेळाडूंदरम्यान संघर्ष पाहायला मिळाला. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांची पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ याच्याशी बाचाबाची झाली. शुबमन गिल आणि शाहीन शहा आफ्रिदी यांच्यातही शाब्दिक चकमक झाली. साहिबजादा फरहानने अर्धशतकानंतर केलेलं बझूका अर्थात गनफायरिंग सेलिब्रेशन चर्चेत राहिलं. फरहानला जोरदार ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.