Vaibhav Suryavanshi: आयपीएल २०२५ स्पर्धा गाजवणारा वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्येही आपल्या आक्रमक फलंदाजीने कहर करतोय. भारताचा १९ वर्षांखालील संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेतील दुसरा सामना नॉर्थॅम्प्टनच्या मैदानावर पार पडला. सलामीला आलेल्या वैभवने ३४ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी केली. यादरम्यान वैभव बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजाने त्याला डिवचलं.
वैभवने नेहमीप्रमाणेच आक्रमक खेळी केली. त्याने ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४५ धावा चोपून काढल्या. वैभवची ही खेळी पाहता वाटलं होतं की, भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारणार. मात्र, अर्धशतकाच्या जवळ असताना वैभवच्या खेळीला पूर्णविराम दिला. ११ व्या षटकात इंग्लंडचा गोलंदाज जॅक होमने वैभवला घरचा रस्ता दाखवला.
वैभव बाद होऊन माघारी जात होता, इतक्यात इंग्लंडच्या गोलंदाजाने त्याने डिवचलं. जॅक होमने त्याला ड्रेसिंग रुमममध्ये जाण्याचा इशारा केला. होमने असं सेलिब्रेशन करणं साहजिक होतं. कारण वैभवने त्याच्या गोलंदाजीवर चांगल्याच धावा गोळा केल्या. वैभवने होमचे ८ चेंडू खेळून काढले. यादरम्यान त्याने १८ धावा चोपल्या. शेवटी तो होमच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या आयुष म्हात्रेला हवी तशी सुरूवात करता आली नाही. आयुष पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशीने विहान मल्होत्रासोबत मिळून डाव सावरला. विहानने ६८ चेंडूंचा सामना करत ४९ धावांची खेळी केली. तर वैभवने अवघ्या ३४ चेंडूत ४५ धावा चोपल्या. राहुल कुमारने ४७ आणि कनिष्क चौहानने ४५ धावा चोपल्या. भारतीय संघाचा पहिला डाव ४९ षटकात २९० धावांवर आटोपला.
इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २९१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडकडून कर्णधार थॉमस रेवने अवघ्या ८९ चेंडूंचा सामना करत १६ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने १३१ धावांची खेळी केली. रॉकी फ्लिंटॉफने ६८ चेंडूंचा सामना करत ३९ धावा केल्या. भारतीय संघाने दिलेलं आव्हान इंग्लंडने शेवटच्या षटकात पूर्ण करत दमदार विजयाची नोंद केली.