Mitchell Starc Fastest Ball, India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात फलंदाजांपेक्षा पावसाने जास्त बॅटिंग केली. हा सामना २६ षटकांचा खेळवला जाणार आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टाकलेल्या एका चेंडूची जोरदार चर्चा रंगली आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी मैदानावर आली. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील पहिला चेंडू स्टार्कने वेगाने टाकला. हा चेंडू रोहितने ढकलला आणि धावून १ धाव पूर्ण केली. यासह रोहितने आपलं खातं उघडलं. पण सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, या चेंडूची गती १७६.५ किमी प्रति तास (KPH) इतकी होती. पण हा दावा खोटा आहे. तांत्रिक बिघाडामुळे चूकून चेंडूची गती जास्त दिसली. स्टार्कने टाकलेल्या या चेंडूची गती १४०.८ किमी प्रति तास इती होती.
क्रिकेटमध्ये १७६.५ किमी प्रति तास गतीने चेंडू टाकणं अशक्य तर नाही, पण खूप कठीण आहे. कारण आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम हा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या नावावर आहे. हा विक्रम मोडून काढणं मुळीच सोपं नाही. स्टार्क सातत्याने १५० किमी प्रति तास गतीने गोलंदाजी करू शकतो. पण त्याने १७६.५ किमी प्रति तास गतीने चेंडू टाकलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर जो दावा केला जात आहे, तो खोटा आहे.
हा सामना रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी अतिशय खास होता. कारण दोघेही २२३ दिवसांनंतर पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरले होते. पण दोघांनाही हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. सलामीला आलेला रोहित शर्मा अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. तर विराट कोहलीला खातंही उघडता आलेलं नाही. या सामन्यात आतापर्यंत ४ वेळा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे षटकं कमी करण्यात आली आहेत.