scorecardresearch

IND vs AUS 2nd ODI: टीम इंडिया मालिका जिंकण्यास सज्ज; ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

India vs Australia 2nd ODI Updates:भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधा रोहित शर्माने पुनरागमन केले आहे.

IND vs AUS 2nd Odi Match 19 March 2023
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी वनडे (फोटो-ट्विटर)

India vs Australia 2023 2nd ODI Match Updates:भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना आज विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्याला दुपारी १:३० पासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हार्दिक पांड्याने मागच्या सामन्यात कर्णधारपदाची उत्तम कामगिरी केली होती. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला १८८ धावांवर रोखले. यानंतर केएल राहुल फॉर्ममध्ये परतला आणि त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याचवेळी रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. या सामन्यातही शमी, सिराज, राहुल आणि जडेजा यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असेल. त्याचबरोबर गेल्या सामन्यात भारतीय टॉप ऑर्डर अपयशी ठरली होती. त्यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

पावसाची शक्यता –

वास्तविक, हवामानाच्या अंदाजानुसार, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान पाऊस टीम इंडियाचे मनसुबे बिघडू शकतो. एक्यूवेदर च्या अहवालानुसार विशाखापट्टणममध्ये रविवारी अडीच ते तीन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणममध्ये पावसाची शक्यता जवळपास ८० टक्के आहे. दुपारी दीड वाजता सामना सुरू होणार आहे. दिवसा दोन तास आणि संध्याकाळी सुमारे एक तास आणि रात्रीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – WPL 2023 RCBW vs GGW: आरसीबीचा सलग दुसरा विजय, गुजरातचा आठ गडी राखून पराभव; सोफी डिव्हाईनची वादळी खेळी

पावसामुळे सामन्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भारताचा विजय रथ रोखला जाऊ शकतो. भारतीय संघाने या वर्षात आतापर्यंत सात एकदिवसीय सामने खेळले असून सातही जिंकले आहेत. भारतीय संघाने वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धची तीन एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकून केली. यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडचाही क्लीन स्वीप केला.

भारत आणि ऑस्ट्रेलियाची आकडेवारी –

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव एकदिवसीय सामना २०१० मध्ये विशाखापट्टणम येथे खेळला गेला होता. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. एकूण विक्रमाबद्दल बोलायचे तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण १४४ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाने यापैकी ८० सामने जिंकले आहेत, तर भारताने ५४ सामने जिंकले आहेत. १० सामने अनिर्णित राहिले.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी</p>

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (यष्टिरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 13:13 IST