India (IND) vs Australia (AUS) 5th T20 Live Cricket Score Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील अखेरचा सामना आज गाबा ब्रिस्बेन येथे खेळवला जात आहे. या टी-२० मालिकेतील चौथा सामना जिंकत भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाची नजर सामना विजयावर असेल. पण पावसाचं चिन्ह असल्याने सामन्यावर याचा काय परिणाम होणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

भारत-ऑस्ट्रेलिया सामना का थांबवला?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना ब्रिस्बेनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात पावसाची चिन्ह असल्याचा हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण सामन्यातील पाचव्या षटकात सामना अचानक थांबवण्यात आला. याचं कारण म्हणजे पावसापूर्वी खराब हवामानामुळे व विजा चमकण्याची शक्यता वर्तवली गेली, त्यामुळे खेळाडूंना मैदानाबाहेर पाठवण्यात आले. खेळाडू डगआऊटमध्ये बसल्यानंतर विजा चमकण्याची शक्यता असल्याने सर्वांना ड्रेसिंग रूममध्ये पाठवण्यात आलं. तर विजा चमकल्यानंतर पाऊस येण्याची चिन्ह असल्याने मैदान कव्हर करण्यात आलं आहे.

दुसऱ्या षटकात ४ चौकार

दुसऱ्या षटकात शुबमन गिलने ४ चौकार लगावत १६ धावा कुटल्या. गिलने द्वारशुईसची धुलाई करत चौकारांचा पाऊस पाडला. तर तिसऱ्या षटकात अभिषेक शर्माला दुसरं जीवदान मिळालं.

पहिल्याच षटकात ड्रामा

पहिल्या षटकात बेन द्वारशुईस गोलंदाजीला आला आणि अभिषेकला पहिल्याच चेंडूवर बीट केलं. यानंतर त्याने चांगला फटका खेळला. तिसऱ्या चेंडूवर गिलने एक धाव काढत अभिषेकला स्ट्राईक दिली आणि त्याने खणखणीत चौकार खेचला. यानंतर अभिषेक पाचव्या चेंडूवरही मोठा फटका खेळण्यासाठी गेला आणि चेंडू हवेत उंच उडाला, पण मॅक्सवेलने मोठी घोडचूक करत साधा झेल सोडला.यानंतर अखेरच्या चेंडूवर गिलने चौकार लगावला आणि भारताने ११ धावा केल्या.

भारताची प्लेईंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन

मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, एडम झांम्पा

नाणेफेक

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पाचव्या टी-२० सामन्याची नाणेफेक कांगारू संघाने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एकही बदल करण्यात आलेला नाही.

पावसाची चिन्ह

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबामध्ये होणाऱ्या सामन्यात पावसाची चिन्ह आहेत. स्थानिक वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ६:१५ वाजता सुरू होणार आहे. संध्याकाळच्या वेळी ब्रिस्बेनमध्ये ९९ टक्के ढगाळ वातावरण असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पावसाची शक्यता ७९ टक्के इतकी असणार आहे. त्यामुळे सामना पूर्ण होणार की पावसामुळे सामना रद्द होणार, यावर सर्वांच्या नजरा असतील.

पाचवा टी-20 सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना आज ८ नोव्हेंबरला ब्रिस्बेनमधील गाबाच्या मैदानावर खेळवला जात आहे. हा सामना मालिकेच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियासाठी अधिक महत्त्वाचा असेल. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, त्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. तर पुढील दोन्ही सामने भारताने जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकण्यावर भर देईल.