Team India Arrived in Perth: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झालेला भारतीय संघ पर्थमध्ये दाखल झाला आहे. पर्थमधूनच भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरूवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रथम वनडे मालिका खेळवली जाणार आहे, ज्यामधील पहिला सामना १९ ऑक्टोबरला पर्थमध्ये होईल. पण यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू निश्चित वेळेनुसा उशिरा पर्थमध्ये दाखल झाले, ज्याचा व्हीडिओदेखील समोर आला आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली ही भारतीय क्रिकेटमधील जोडगोळी ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेसाठी संघात परतली आहे. हे दोन्ही दिग्गज खेळाडू नवा वनडे कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियात खेळताना दिसतील. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्या भेटीचा व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला होता जो प्रचंड व्हायरल झाला होता.
रोहित-विराटसह टीम इंडिया पर्थमध्ये दाखल
१५ ऑक्टोबर रोजी पहाटे दिल्ली विमानतळावर दाखल झालेल्या शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने पहाटे ४ वाजता पर्थमधील त्यांच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं. ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या वृत्तांनुसार, दिल्लीतील विमान नियोजित वेळेपेक्षा सुमारे चार तास उशिराने होतं. त्यामुळे सिंगापूरमध्ये जोडलेली उड्डाणं आणि ट्रांझिट वेळापत्रकात फेरबदल झाला, आणि त्यामुळे पोहोचण्याची वेळेत अधिक विलंब झाला.
दिल्लीतील विमानाच्या विलंबामुळे सिंगापूरमधील वेळापत्रकातही बदल करण्यात आला, परिणामी भारतीय संघ १६ ऑक्टोबरला पहाटे पर्थमध्ये पोहोचला. भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी पर्थला पोहोचली तेव्हा विराट कोहली, रोहित शर्मा, शुबमन गिल आणि केएल राहुल उपस्थित होते. भारत मिशेल मार्शच्या नेतृत्त्वाखालील संघाविरूद्ध ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळेल, ही मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल.
भारतीय क्रिकेट पत्रकार विमल कुमार यांनी दिलेल्या वृत्तानुसार, पर्थ विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था होती आणि त्यामुळे काही चाहते त्यांच्या आवडत्या स्टार खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी भारतीय संघाच्या हॉटेलबाहेर वाट पाहत होते. पण, रात्री बराच उशीर झाल्यामुळे, थकलेले भारतीय खेळाडू हॉटेलबाहेर वाट पाहणाऱ्या चाहत्यांसह फोटो वगैरे न काढता थेट हॉटेलमध्ये गेले.
टीम इंडिया १९ ऑक्टोबर रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळेल. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी दुसरा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ते अॅडलेडला पोहोचतील. तिथून संघ सिडनीला रवाना होईल, जिथे ते २५ ऑक्टोबर रोजी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळतील.