IND vs BAN World Cup 2023: विश्वचषक २०२३ मध्ये आज पुण्यात भारत विरुद्ध बांगलादेश सामना होणार आहे. यापूर्वी बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने रन-मशीन कोहलीशी असलेल्या त्याच्या शत्रुत्व किंवा असं म्हणूया दोघांमध्ये होणाऱ्या चढाओढीबद्दल भाष्य केले. आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये विराट कोहली अनेकदा त्यांच्या मैदानातील इशाऱ्यांमुळे, हावभावांमुळे सुद्धा चर्चेत आला होता. मोहम्मद रिझवानला टोमणा मारणे असो किंवा अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नवीन-उल-हक बरोबर हसत केलेली गळाभेट असो कोहलीची प्रत्येक कृती चर्चेत येतेच.

आज गुरुवारी, पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ICC विश्वचषकाच्या १७ व्या सामन्यात भारत आशियाई प्रतिस्पर्धी बांगलादेशला आव्हान देणार आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) विश्वचषक स्पर्धेच्या आगामी सामन्यापूर्वी बोलताना, बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने दावा केला की कोहली जेव्हाही फलंदाजीला जातो तेव्हा तो नेहमी त्याला डिवचण्याचा प्रयत्न करतो.

“कोहली नेहमीच माझ्यासमोर बोलंदाजी करतो”

रहिमने स्टार स्पोर्ट्सला सांगितले, “जगातील काही फलंदाजांना स्लेजिंग आवडते म्हणजे जर तुम्ही त्यांना चिडवण्याचा किंवा डिवचण्याचा प्रयत्न केलात, त्यांना मैदानात शाब्दिक टिपण्णी करून टोलवलेत तर त्यांना आणखी ऊर्जा येते. कोहली सुद्धा त्यातलाच एक आहे. त्याला चिडवलं की तो आणखी उत्साहाने खेळतो म्हणून आम्ही त्याला अजिबातच डिवचत नाही उलट मी माझ्या गोलंदाजांना सांगतो की तुम्ही काही न बोलता लवकरात लवकर फक्त त्याला बाद करा.”

“जेव्हाही मी त्याच्याविरुद्ध खेळतो, प्रत्येक वेळी जेव्हा मी फलंदाजीला जातो तेव्हा तो नेहमी मला चिडवण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला स्पर्धेचं वातावरण आवडतं. त्याला कोणताही क्रिकेट सामना गमवायचा नसतो म्हणूनच मला भारतासह व विशेषतः कोहलीच्या विरुद्ध खेळायला खूप आवडतं.”

हे ही वाचा<< India vs Bangladesh : जेव्हा बांगलादेशने भारताचं वर्ल्डकप स्वप्न धुळीस मिळवलं होतं

दुसरीकडे, पुण्यातील विश्वचषक स्पर्धेपूर्वी बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन याचे कोहलीने कौतुक केले. शाकिबने पाच वेळा कोहलीला बाद केले आहे. भारताविरुद्ध गोलंदाज म्हणून शाकिब हा टीम इंडियासाठी कसा आव्हानात्मक ठरू शकतो, त्याची कोहलीलाही जाणीव आहे. कोहली म्हणाला की, “गेल्या काही वर्षांत, मी त्याच्या (शकिब) विरुद्ध खूप खेळलो आहे. त्याच्याकडे अप्रतिम नियंत्रण आहे. तो खूप अनुभवी गोलंदाज आहे. तो नवीन चेंडूवर खूप चांगली गोलंदाजी करतो, फलंदाजाला कसे फसवायचे हे त्याला माहित आहे.”