Mohammed Siraj Wicket: लॉर्ड्सवर कसोटी सामना जिंकणं मुळीच सोपं नसतं. या मैदानावर धावा करताना आणि विकेट्स घेताना गोलंदाजांचा चांगलाच कस लागतो. इंग्लंडने पहिल्या डावात ३८७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने देखील ३८७ धावा केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडला १९२ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील प्रमुख फलंदाज फ्लॉप ठरले. भारताकडून रवींद्र जडेजा शेवटपर्यंत उभा राहिला. त्याला बुमराह आणि सिराजकडून चांगली साथ मिळाली. शेवटी सिराजला नशिबाची साथ मिळाली नाही.
भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा रवींद्र जडेजा खंबीरपणे उभा राहतो. पण त्याला इतर फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होती ते स्वस्तात माघारी परतले. पण गोलंदाज शेवटपर्यंत लढले. लंचच्या आधी नितीश कुमार रेड्डी बाद झाला. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी बुमराह आणि सिराजवर आली. जडेजाने या दोघांसोबत मिळून किल्ला लढवला. आधी बुमराहने जवळपास १०० मिनिटं फलंदाजी केली. त्यानंतर सिराजही मैदानावर टिकून फलंदाजी करत होता.
सिराजचं बॅड लक
रवींद्र जडेजावर धावा करण्यासह विकेट वाचवण्याचाही दबाव होता. हा दबाव त्याने चांगल्याने हाताळला. चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर १ धाव घेऊन त्याने पुढच्या षटकात स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. त्याला सिराज आणि बुमराहनेही चांगली साथ दिली. पण नशिबाने साथ न दिल्याने त्याला आपली विकेट गमवावी लागली.
तर झाले असे की, भारतीय संघाला २२ धावांची गरज असताना इंग्लंडकडून ७५ वे षटक टाकण्यासाठी शोएब बशीर गोलंदाजीला आला. या षटकातील सुरूवातीचे २ चेंडू खेळल्यानंतर, तिसऱ्या चेंडूवर जडेजाने १ धाव घेतली आणि स्ट्राईक मोहम्मद सिराजला दिली.सिराजला या षटकातील ३ चेंडू खेळून काढायचे होते. या षटकातील पाचवा चेंडू सिराजने डिफेन्स केला. पण डिफेन्स केल्यानंतर चेंडू यष्टीला जाऊन आदळला. त्यामुळे सिराजचा डाव ३० चेंडू खेळून ४ धावांवर आटोपला आणि भारताचा २२ धावांनी पराभव झाला.
भारताने हा सामना गमावला असला तरीदेखील सिराज, जडेजा आणि बुमराहने फलंदाजीत दिलेलं योगदान कोणीच विसरू शकणार नाही. बुमराह १०० मिनिटं खेळपट्टीवर टिकून होता, जडेजा शेवटपर्यंत उभा राहिला आणि सिराजच्या खांद्याला चेंडू लागूनही तो पुन्हा फलंदाजीला आला.