Rohit Sharma Funny Conversation Video Viral : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात डीआरएस हा सर्वात चर्चेचा विषय ठरला. अनेक ‘अंपायर्स कॉल’चे निर्णय टीम इंडियाच्या विरोधात गेले. त्यामुळे गोलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या दिवशी लवकर रिव्ह्यू गमावले होते. पण रोहित शर्माला ही चूक पुन्हा करायची नव्हती. दुसऱ्या डावात भारतीय संघ गोलंदाजी करताना हिटमॅन रिव्ह्यूबाबत गोंधळलेला दिसला. त्यामुळे तो जडेजाने केलेल्या अपीलनंतर डीआरएस घेण्याबाबत सहकाऱ्यांशी चर्चा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रोहित शर्माने शेवटच्या सेकंदात घेतला निर्णय –
ही घटना अशा वेळी घडली, जेव्हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सविरुद्ध रवींद्र जडेजा एलबीडब्ल्यूची अपील केली, तेव्हा या अपीलवर अंपायरने त्याला नॉट आऊट घोषित केले. मात्र, जडेजाला त्याच्या चेंडूवर पूर्ण विश्वास होता आणि त्याने कर्णधार रोहित शर्माला रिव्ह्यू घेण्याची विनंती केली. यानंतर रोहितने जुरेलचाही सल्ला घेतला. दरम्यान रोहितने डीआरएस घेण्यापूर्वी आपल्या सहाकाऱ्यांना जे सांगितले, ते स्टंप माइकमध्ये टिपले गेले आहे.
रोहितचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो खेळाडूंना सांगत होता की, ‘काही सेकंद बाकी आहेत, सर्वांनी डोकं लावा.’ शेवटच्या सेकंदापर्यंत खेळाडूंचा योग्य प्रतिसाद न मिळाल्याने रोहित शर्माने रिव्ह्यू घेण्याचे संकेत दिले. पण यानंतर रोहितला नशीबाने साथ दिली नाही. कारण रिप्ले पाहिल्यानंतर अंपायर्स कॉल देण्यात आला. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स बचावला.
हेही वाचा – IND vs ENG : अश्विनने कुंबळेचा विक्रम मोडत रचला इतिहास, ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय
समालोचकांनीही घेतली मजा –
स्टंप माईकमध्ये रोहित शर्माचा आवाज ऐकून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या दिनेश कार्तिक आणि दीपदास गुप्ता यांनी मजा घेतली. दिनेश कार्तिक म्हणाला, ‘आता आम्हाला माहित आहे की डीआरएस घेण्यासाठी कशी चर्चा होते.’ सहकारी अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दीपदास गुप्ता पुन्हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हसताना दिसला.
सामन्याबद्दल बोलायचे, तर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने १९२ धावांचा पाठलाग करताना एकही विकेट न गमावता ४० धावा केल्या आहेत. यष्टीमागे रोहित शर्मा २४ आणि यशस्वी जैस्वाल १६ धावांवर नाबाद परतले. आता भारताला विजयासाठी चौथ्या दिवशी आणखी १५२ धावा करायच्या आहेत. याआधी इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ १४५ धावांवर गारद झाला होता. अशा स्थितीत भारतासमोर १९२ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने पाच आणि कुलदीप यादवने चार विकेट्स घेतला.