IND vs ENG 4th Test Day 5 Live Scorecard in Marathi: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात कमालीची फटकेबादजी करत इंग्लंडकडून विजयाचा घास हिसकावून घेतला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या. यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात जो रूट-बेन स्टोक्स यांच्या शतकांच्या जोरावर ६६९ धावा केल्या आणि ३११ धावांची आघाडी मिळवली.
भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला, पण त्यांची सुरूवात फार वाईट झाली आणि आता भारत चौथी कसोटी गमावणार असं चित्र दिसत असताना भारताच्या ४ फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडत कमालीची फलंदाजी करत सामना अनिर्णित करण्यात मोठी भूमिका बजावली. केएल राहुल आणि शुबमन गिलच्या जोडीने १८० अधिक धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. राहुल ९० धावा करत तर शुबमन गिल १०३ धावा करत नाबाद परतले. यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकं झळकावली आणि विकेट्स न गमावता सामना अनिर्णित राहिला.
रवींद्र जडेजा-वॉशिंग्टन सुंदरची शतक
रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मँचेस्टर कसोटीतील दुसऱ्या डावात शतकं झळकावली. जडेजाने १८५ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकारासह १०७ धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने २०६ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह १०१ धावा केल्या.
रवींद्र जडेजाचं शतक
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने षटकार लगावत आपलं शतक पूर्ण केलं. जड्डूने १८२ चेंडूत १२ चौकार आणि एक षटकारासह १०१ धावा केल्या. यासह भारतीय संघाने १०५ धावांची आघाडी घेतली आहे. कसोटी सामना ड्रॉ होत असला तरी संघाने इंग्लंडच्या गोलंदाजांना मात्र घाम फोडला आहे. यासह इंग्लंडच्या भूमीवर सहा किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
जड्डू-सुंदर इंग्लंडवर पडले भारी
रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जोडीने चांगली फलंदाजी करत १०० अधिक धावांची भागीदारी रचली आहे. इंग्लंडने ३११ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने २ विकेट्स गमावत सुरूवात केली, यानंतर हा कसोटी सामना वाचवण्यासाठी भारताला दीड दिवस म्हणजे चौथा दिवस अर्धा आणि पाचवा अख्खा दिवस फलंदाजी करून सामना ड्रॉ करण्याची रणनिती होती. आधी राहुल व गिल आणि नंतर जडेजा व सुंदर यांनी शतकी भागीदारी रचत हे मनसुबे फत्ते केले आहेत. यासह आता अखेरच्या दिवसात २२ षटकं शिल्लक आहेत.
टीब्रेक
रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकी भागीदारी रचत इंग्लंडच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. दोन्ही फलंदाजांनी शानदार अर्धशतकं झळकावत भारताला आघाडी मिळवून दिली आहे. भारताने टीब्रेकनंतर ४ बाद ३२२ धावा केल्या आहेत. यासह भारताकडे आता ११ धावांची आघाडी आहे.
रवींद्र जडेजाचं अर्धशतक आणि भारताने खोडून काढली इंग्लंडची आघाडी
रवींद्र जडेजाने ८७ चेंडूत ५ चौकारांसह ५० धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह भारताने इंग्लंडची आघाडी मागे टाकत टीम इंडिया पुढे गेली आहे. भारतीय संघाने आता ४ चेंडूत ३१४ धावा केल्या आहेत, यासह संघाने ३ धावांची आघाडी घेतली आहे. तर जडेजा आणि सुंदरने ९२ धावांची भागीदारी रचली आहे.
वॉशिंग्टन सुंदरचं अर्धशतक
वॉशिंग्टन सुंदरने स्टोक्सच्या षटकात षटकार आणि चौकार लगावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ११८ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावा करत अर्धशतक केलं.
ऋषभ पंत मैदानात दाखल
ऋषभ पंतला पहिल्याच दिवशी पायाला दुखापत झाली होती. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर स्विप शॉट खेळताना पंतच्या उजव्या पायावर चेंडू आदळला आणि त्याच्या पायाचं बोट फ्रॅक्चर झालं आहे. यानंतर पंत पाय फ्रॅक्चर असतानाही दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला. त्यानंतर त्याच्या पायाला पुन्हा फ्रॅक्चर करण्यात आलं. पंत आता फ्रॅक्चरसह कुबड्या घेऊन ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर येतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. गरज भासल्यास पंत संघासाठी पाचव्या दिवशीही फलंदाजीला उतरण्याची शक्यता आहे.
लंचब्रेक
भारतीय संघाने पहिल्या सत्रात २ महत्त्वाचे विकेट्स गमावले आहेत. यासह भारताने आतापर्यंत ४ बाद २२३ धावा केल्या आहेत. तर इंग्लंडकडे अद्याप ८८ धावांची आघाडी आहे.
भारताला चौथा धक्का
जोफ्रा आर्चरच्या ८८व्या षटकात गिल झेलबाद झाला. आर्चरने टाकलेला चेंडू गिलच्या बॅटची कड घेत यष्टीरक्षक जेमी स्मिथच्या हातात पोहोचला. यासह इंग्लंडला गिलच्या रूपात सर्वात मोठी विकेट मिळाली आहे. गिल २३८ चेंडूत १२ चौकारांसह १०३ धावा करत बाद झाला. यानंतर पुढच्या चेंडूवर जडेजा झेलबाद होणार होताच पण रूटने झेल सोडला आणि त्याला एक जीवदान मिळालं.
शुबमन गिलचं शतक
कर्णधार शुबमन गिलने शानदार खेळी करत आपलं या मालिकेतील चौथं शतक झळकावलं आहे. गिलने २२८ चेंडूत १२ चौकारांसह १०० धावा केल्या. यासह भारतीय संघाने २०० धावांचा टप्पा गाठला आहे. यासह इंग्लंडचा संघ अद्याप १०१ धावांनी पुढे आहे. राहुल बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला मैदानावर पाठवलं आहे. त्यानेही गिलला चांगली साथ देत काही फटके खेळले आहेत.
शुबमन गिलच्या बोटाला दुखापत
बेन स्टोक्सचा भेदक चेंडू येऊन गिलच्या बोटांवर आदळला आणि त्यानंतर हेल्मेटवर लागला. यानंतर शुबमन गिल वेदनेने कळवळताना दिसला. पण त्याने माघार न घेता फिजिओने तपासल्यानंतर पुन्हा खेळायला सुरूवात केली. गिल ९० धावांवर खेळत आहे. याशिवाय गिलने या मालिकेत ७०० धावा पूर्ण केल्या आहेत.
भारताला पाचव्या दिवशी धक्का
बेन स्टोक्सला त्रास होत असतानाही पाचव्या दिवशी तो गोलंदाजीला उतरला आणि संघाला विकेट मिळवून दिली. १८० अधिक धावांची भागीदारी तोडत त्याने भारताला केएल राहुलच्या विकेटच्या रुपात धक्का दिला आहे. स्टोक्सचा चेंडू विकेटच्या एकदम मधोमध राहुलच्या पॅडवर जाऊन आदळला आणि पायचीत होत तो माघारी पडला. राहुल ९० धावा करत बाद झाल्याने अवघ्या १० धावांनी त्याचं शतक हुकलं.
पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरूवात
इंग्लंडने फिरकीपटू लियाम डॉसनसह गोलंदाजीला सुरूवात केली आणि भारताने पहिल्या षटकात १ धाव घेतली. तर दुसऱ्याच षटकात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजीला आला आहे.
बेन स्टोक्स पाचव्या दिवशी गोलंदाजी करणार?
तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना बेन स्टोक्सच्या पायात क्रॅम्प येत असल्याने तो रिटायर्ड होत माघारी परतला. पण काही वेळानंतर पुन्हा फलंदाजीला उतरला आणि चौथ्या दिवशी त्याने शतकही झळकावलं. पण चौथ्या दिवशी त्याच्या पायाच्या दुखापतीमुळे तो गोलंदाजी करताना दिसला नाही. ज्याचा इंग्लंडला फटका बसला आणि भारताने चांगली कामगिरी केली. बेन स्टोक्स हा या मालिकेतील इंग्लंडचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे आणि पहिल्या डावात त्याने ५ विकेट्सही घेतले. आता पाचव्या दिवशी बेन स्टोक्स गोलंदाजी करणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.
भारत-इंग्लंड मँचेस्टर कसोटी चौथ्या दिवशी काय घडलं?
इंग्लंडच्या संघाने मँचेस्टर कसोटीतील पहिल्या डावात वादळी फलंदाजी करत भारताच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावांचा डोंगर उभारत ३११ धावांची मोठी आघाडी घेतली. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात खूपच खराब झाली. भारताने पहिल्या षटकांत दोन चेंडूत दोन विकेट गमावले. यशस्वी जैस्वाल डकवर आणि साई सुदर्शन गोल्डन डकवर झेलबाद होत माघारी परतले. पण त्यानंतर आलेल्या केएल राहुल आणि शुबमन गिल यांनी १७४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. गिल ७८ धावा आणि राहुल ८७ धावा करत नाबाद माघारी परतले.