मँचेस्टर : प्रत्येक कसोटी क्रिकेट सामन्यापूर्वी भारताची संघनिवड हा चर्चेचा विषय असतो. त्यातही जसप्रीत बुमराच्या उपलब्धतेवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, आता भारताच्या संघ व्यवस्थापनासमोर अन्य एक पेच निर्माण झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यष्टिरक्षण करताना ऋषभ पंतच्या बोटाला दुखापत झाली. त्याची दुखापत कितपत बरी झाली हे अद्याप स्पष्ट नसल्याने मँचेस्टर येथे बुधवारपासून (२३ जुलै) रंगणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी ध्रुव जुरेलला खेळविण्याबाबत भारतीय संघाला विचार करावा लागत आहे.
भारतीय संघाने शनिवारी लंडनहून मँचेस्टर गाठले. त्याआधी त्यांचे बेकनहॅम येथे सराव सत्र झाले. यात पंतने यष्टिरक्षण किंवा फलंदाजी केली नाही. त्याच वेळी जुरेल विशेष मेहनत घेताना दिसला. त्याने नेट्समध्ये भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलविरुद्ध फलंदाजी केली. मॉर्नेने सातत्याने उजव्या यष्टीबाहेर चेंडू टाकत जुरेलची परीक्षा पाहिली. यात तो उत्तीर्ण झाला. त्याने भक्कम बचाव राखताना काही चांगले फटकेही मारले. त्यानंतर त्याने भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांच्या मार्गदर्शनाखाली यष्टिरक्षणावरही मेहनत घेतली. त्यामुळेच जुरेलला संधी मिळण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अंतिम निर्णय सामन्याच्या पूर्वसंध्येला घेतला जाणे अपेक्षित आहे.
बेकनहॅम येथील सराव सत्रानंतर माध्यमांशी संवाद साधताना भारतीय संघाचा साहाय्यक प्रशिक्षक रायन टेन दोएशहातेने पंतच्या उपलब्धतेबाबत सकारात्मक असल्याचे विधान केले होते. मात्र, तो यष्टिरक्षण करणार की नाही, याचे स्पष्ट उत्तर देणे त्याने टाळले होते. ‘‘तिसऱ्या कसोटीत फलंदाजी करतानाही पंतला वेदना झाल्या. मात्र, आता विश्रांतीमुळे त्याची दुखापत बरी होत आहे. यष्टिरक्षण हा या प्रक्रियेचा अखेरचा भाग आहे. डावाच्या मध्यातच पुन्हा यष्टिरक्षक बदलावा लागेल अशी स्थिती आम्हाला ओढवून घ्यायची नाही,’’ असे दोएशहातेने सांगितले होते.
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात यष्टिरक्षण करताना पंतच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला पहिल्या डावातील उत्तरार्ध, तसेच दुसऱ्या डावात यष्टिरक्षण करता आले नाही. त्याने दोन्ही डावांत फलंदाजी केली, पण त्याला चेंडू मारताना अडचण येत होती. आता मँचेस्टर कसोटीसाठी तो फलंदाज म्हणून उपलब्ध असणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, यष्टिरक्षण करताना चेंडू वारंवार ग्लोव्ह्जवर आदळल्यास पंतची दुखापत बळावण्याचा धोका आहे. त्यामुळेच यष्टिरक्षणाची धुरा जुरेलकडे सोपवून पंतला केवळ फलंदाज म्हणून खेळविण्याबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागत आहे.
२५ : ‘लॉर्डस’ येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात जुरेलने यष्टिरक्षण केले. यात त्याने ‘बाइज’च्या रूपात २५ अवांतर धावा दिल्या. मात्र, यष्टिरक्षक म्हणून त्याच्या क्षमतेवर भारतीय संघाला पूर्ण विश्वास असल्याचे समजते.
फलंदाजीतही प्रभाव
– पंतने भारतीय संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून आपले स्थान पक्के केल्याने जुरेलला सातत्याने सामने खेळायला मिळालेले नाहीत. मात्र, जेव्हाही संधी मिळाली, तेव्हा जुरेलने फलंदाज म्हणून प्रभावित केले आहे.
– गतवर्षी मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जुरेलने कसोटी पदार्पण केले. या मालिकेतील चौथ्या कसोटीत त्याने रांची येथे आव्हानात्मक खेळपट्टीवर ९० आणि नाबाद ३९ धावा करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
– तसेच सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेपूर्वी भारत ‘अ’ संघाकडून खेळताना इंग्लंड लायन्सविरुद्ध जुरेलने अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने चारपैकी तीन डावांत अर्धशतक साकारले होते. त्यामुळेच त्याच्याबाबत भारतीय संघ सकारात्मक विचार करत आहे.
कोणाच्या जागी संधी?
जुरेलला संधी द्यायची झाल्यास भारतीय संघाला करुण नायर आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यापैकी एकाला वगळावे लागू शकेल. करुणला या मालिकेतील तीनही कसोटीत छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे त्याचे स्थान धोक्यात आले आहे. नितीशने ‘लॉर्डस’ कसोटीत तीन बळी मिळवले. तसेच दोन्ही डावांत तो खेळपट्टीवर बराच वेळ टिकून राहिला. मात्र, त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याबाबतही विचार केला जाऊ शकेल.