IND vs ENG Varun Chakravarthy on toss won opt to bowl : राजकोट टी-२० सामन्यात इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय टीम इंडियासाठी चुकीचा ठरला का? याबाबत भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने वक्तव्य केले आहे. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला, पण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आमच्या संघाच्या विरोधात गेला नाही, असे वरुण चक्रवर्तीचे मत आहे. वरुण चक्रवर्तीनेही या मालिकेत दोन सामने शिल्लक असून फलंदाजीचे संयोजन आजमावण्यासाठी अजून वेळ असल्याचे म्हटले आहे.

वरुण चक्रवर्ती काय म्हणाला?

वरुण चक्रवर्ती सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला, “आम्हाला दोन सामने जिंकायचे आहेत. त्यासाठी आम्हाला दोन सामने खेळायचे आहेत आणि आम्हाला इतर फलंदाजांचीही चाचणी घ्यायची आहे.” भारताने त्यांचे मागील दोन सामने अशाच परिस्थितीत जिंकले होते याकडे लक्ष वेधून त्याने निकालात नाणेफेक हा प्रमुख घटक असल्याचा दावा नाकारला. तो म्हणाला, “हे बघा, मला वाटत नाही की नाणेफेक आमच्या विरोधात गेली. कारण आम्ही गेल्या दोन सामन्यांमध्ये तेच केले आहे आणि आम्ही जिंकलो आहोत. हेच खेळाचे स्वरूप आहे. शेवटचा सामना देखील अटीतटीचा होता. आम्ही हरलो पण असतो आणि आम्ही हा सामना जिंकू शकलो असतो.”

टी-२० हा आक्रमक फॉरमॅट –

संघ साहसी पद्धतीने क्रिकेट खेळण्यासाठी समर्पित असल्याचे सांगत त्याने भारताच्या आक्रमक डावपेचाचा बचाव केला. चक्रवर्ती म्हणाला, “टी-२० हा आक्रमक फॉरमॅट मानला जातो. तुम्ही जास्त तक्रार करू शकत नाही आणि हा एक अतिशय परिणाम देणारा खेळ आहे. त्यामुळे तुम्ही काय म्हणू इच्छित आहात हे मी समजू शकतो, परंतु त्यांनी अशा प्रकारे खेळण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा क्रिकेटचा ब्रँड आहे, जो भारतीय संघाला खेळायचा आहे आणि ते त्यानुसार चांगले करत आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्याबद्दल बोलायचे तर, इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावून १७१ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये बेन डकेटने सर्वाधिक ५१ धावा केल्या तर लियाम लिव्हिंगस्टनने ४३ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने ५ तर हार्दिक पंड्याने २ विकेट्स घेतल्या. भारतीय संघ१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ९ बाद १४५ धावाच करु शकला. ज्यामुळे भारताला २६ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतासाठी हार्दिक पंड्याने सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले. इंग्लंडसाठी जेमी ओव्हर्टनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तीन सामन्यांनंतर भारत मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. चौथा सामना ३१ जानेवारीला पुण्यात होणार आहे. यानंतर 2 फेब्रुवारीला मुंबईत शेवटचा सामना होणार आहे.