India took a 126 run lead in the first innings : राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ३१९ धावांवर आटोपला. बेन डकेटने संघासाठी १५३ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय कर्णधार बेन स्टोक्सने ४१ धावा केल्या. या काळात भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवणारा इंग्लंड तिसऱ्या दिवशी फ्लॉप दिसला आणि दुसऱ्या सत्रातच कोसळला. इंग्लिश संघाने शेवटच्या ५ विकेट अवघ्या २० धावांत गमावल्या. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावाच्या जोरावर १२६ धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या दिवशी बॅझबॉल क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंडने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने आक्रमक फलंदाजी करत ३५ षटकांत २ बाद २०७ धावा केल्या होत्या. पण इंग्लंडला तिसऱ्या दिवशी ही लय राखता आली नाही. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने ८ विकेट गमावल्या, त्यानंतर भारताला १२६ धावांची आघाडी मिळाली.
इंग्लंडने दुसऱ्या दिवशी ज्या दमदार पद्धतीने फलंदाजी केली, ते पाहता तिसऱ्या दिवशी ८ विकेट्स हातात असल्याने ते सहज आघाडी घेईल, असा अंदाज बांधला जात होता, मात्र तसे झाले नाही. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आपली पकड घट्ट करत इंग्लिश संघाच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. भारतीय संघ ४४५ धावांत सर्वबाद झाल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजीला उतरताना चांगली सुरुवात केली. सलामीला आलेल्या झॅक क्रॉऊली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची (८० चेंडू) भागीदारी केली. इंग्लिश संघाला पहिला धक्का १४व्या षटकात झॅक क्रॉऊलीच्या रूपाने बसला, जो २८ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
त्यानंतर बेन डकेट आणि ऑली पोप यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. मोहम्मद सिराजचा बळी ठरलेल्या ओली पोपच्या रूपाने इंग्लंडने दुसरी विकेट गमावली. पोपने ३९ धावा केल्या. त्यानंतर अनुभवी फलंदाज जो रूटच्या रूपाने इंग्लंडने तिसरी विकेट गमावली. रूट ३१ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने केवळ १८ धावा करून बाद झाला.
२० धावांच्या आत इंग्लंडचे ५ फलंदाज बाद –
त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स ४१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. स्टोक्सच्या विकेटनंतर इंग्लंडची धावसंख्या २९९/६ होती. त्यानंतर संपूर्ण संघ ३१९ धावांवर बाद झाला. इंग्लंडला सातवा धक्का बेन फॉक्सच्या (१३) रूपाने, आठवा रेहान अहमदच्या (०६) रूपाने, नववा टॉम हार्टलीच्या (०९) रूपाने आणि दहावा धक्का जेम्स अँडरसनच्या (०१) रूपाने बसला. .