नॉटिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारी सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व पहायला मिळालं. अगदी पहिल्या सत्रापासूनच भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. पहिल्या सत्रामध्येच इंग्लंडचा झॅक क्रॉली बाद झाल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि विकेटकीपर ऋषभ पंत हे मैदानातच जोरजोरात हसू लागले. त्यानंतर विराट मैदानातच पंतच्या पाया पडल्याचं चित्रही क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळालं.

२१ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झॅक क्रॉली बाद झाला. मात्र क्रॉली बाद होण्याआधी मैदानावर बराच गोंधळ झाला. झालं असं की याच षटकामध्ये भारताने आपली एक रिव्ह्यूची संधी गमावली होती. मात्र गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराजने षटकातील शेवटचा चेंडू इनस्वींग टाकला. उजव्या हाताचा फलंदाज असणाऱ्या क्रॉलीला हा चेंडू कळला नाही आणि तो त्याच्या उजव्या पायाला लागला.

मात्र हा चेंडू स्टम्पवर जाईल असं वाटल्याने क्रॉलीने तो खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू थेट पंतच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावला. चेंडू हा बॅटला लागून गेल्यासारखं वाटल्याने सिराजने पंचांकडे अपील केलं, मात्र पंचांनी क्रॉलीला नाबाद ठरवलं. तरीही विकेटकीपर असणाऱ्या पंतला हा चेंडू नक्कीच बॅटला लागून आल्यासारखं वाटलं. तो कोहलीला रिव्ह्यू घेण्यास सांगू लागला. मात्र कोहली आधीच एक रिव्ह्यू वाया गेल्याने लगेच रिव्ह्यू घेण्याच्या विचारात नव्हता. रिव्ह्यू घ्यावा की नाही हे कोहली सिराजला विचारत होता. मात्र पंत अगदी कोहलीच्या जवळ जाऊन रिव्ह्यू घे अशी मागणी करत होता. अखेर कोहलीने रिव्ह्यू घेतला आणि पंतचा अंदाज बरोबर ठरला.

पंचांनी क्रॉलीला बाद घोषित केल्यानंतर विराट पंतसाठी टाळ्या वाजवू लागला. इतक्यावर कोहली थांबला नाही तर तो हसत हसत पंतजवळ गेला आणि वाकून त्याच्या पायाही पडला. पंतचा रिव्ह्यूचा अंदाज अचूक आल्याने विराटने त्याचे पाय धरल्याचं पहायला मिळालं. या साऱ्या प्रकारामुळे मैदानात सारेच भारतीय खेळाडू हसू लागले. पंतच्या अंदाजामुळेच क्रॉलीला लवकर तंबूत पाठवण्यात भारताला यश आलं. क्रॉलीने ६८ चेंडूंमध्ये २७ धावांची खेळी केली. आपल्या २७ पैकी १६ धावा क्रॉलीने चौकारांच्या माध्यमातून केल्या.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हाच निर्णय त्याच्या अंगउलट आला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ १८३ धावांत सर्वबाद झाला आहे. कर्णधार जो रूट वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ४ बळी तर शमीने ३ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. त्यानंतर भारताने आपल्या डावाला सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसअखेर त्यांनी १३ षटकात बिनबाद २१ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि केएल राहुल प्रत्येकी ९ धावांवर नाबाद आहेत.