भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली. पुढीलवर्षी भारतात होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकाची तयारी ही भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या याच मालिकेपासून सुरु केली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताच्या दोन युवा गोलंदाजांनी यांनी एकदिवसीयमध्ये पदार्पण केले. टी२० मध्ये शानदार प्रदर्शन केलेला डावखुरा स्विंग गोलंदाज अर्शदीप सिंग आणि भारताची तोफ समजल्या जाणाऱ्या वेगवान गोलंदाज उमरान मलिक या दोघांना आजच्या सामन्यात अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑकलंड येथे सुरु असलेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाने ते आमंत्रण स्वीकारत कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी १२४ धावांची सलामी भागीदारी केली. २४ षटकात भारताने १२४ धावा केल्या होत्या. पण लागोपाठ शिखर धवन ७२ आणि शुबमन गिल ५० धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला यष्टीरक्षक ऋषभ पंत याने अवघ्या १५ धावा केल्या. त्याचा खराब फॉर्म अजूनही सुरूच आहे. टीम इंडियाचा मिस्टर ३६० डिग्री अशी ओळख असणारा सूर्यकुमार यादव देखील फार काही करू शकला नाही, अवघ्या ४ धावा केल्या.

भारताची पडझड झाल्यानंतर मधल्याफळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने डाव सावरत शानदार अर्धशतक झळकवले. त्याने ७६ चेंडूत ८० धावांची दमदार खेळी केली. त्याला संजू सॅमसन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मोलाची साथ देत टीम इंडियाला ३०० चा टप्पा गाठण्यास मदत केली. संजूने ३८ चेंडूत ३६ तर वॉशिंग्टन सुंदरने सुरेख फटकेबाजी करत १६ चेंडूत ३७ धावा करत भारताची धावसंख्या ३०६ पर्यत पोहचवली.

हेही वाचा :   IND vs NZ: “तो संघावर ओझे…” माजी भारतीय क्रिकेटपटूने ऋषभ पंतबद्दल केले मोठे वक्तव्य

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या २४ षटकानंतर भारताला एकापाठोपाठ एक असे चार धक्के देत भारताला साडेतीनशे धावा करण्यापासून रोखले. टिम साऊदी आणि  लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर अॅडम मिल्ने याने एक गडी बाद करत त्या दोघांना साथ दिली. भारत हा सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. एवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना देखील खूप अडचण होणार हे निश्चितच.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 1st odi shikhar dhawan shreyas iyers brilliant fifties india challenged new zealand by 307 runs avw
First published on: 25-11-2022 at 11:14 IST