वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा चौथा दिवस पावसामुळे वाया गेला आहे. आज एकही चेंडू खेळवला गेला नाही. तब्बल पाच तास खेळ सुरू होण्याची वाट पाहण्यात आली, पण पावसाने चाहत्यांना निराश केले आहे. काल रविवारी तिसऱ्या दिवशी काईल जेमीसनच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करली, तर न्यूझीलंडच्या फलंदाजीपुढे गोलंदाजांनी निराशा केली. न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या माऱ्यापुढे भारताचा पहिला डाव २१७ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात २ बाद १०१ अशी मजल मारत सामन्यावरील पकड घट्ट केली आहे. इंग्लंडमध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या डेव्हॉन कॉन्वेच्या (१५३ चेंडूंत १२ चौकारांसह ५४ धावा) अर्धशतकाचा यात समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडचा पहिला डाव (तिसरा दिवस)

टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला आणि पहिल्या डावाला सुरुवात केली. इंशात शर्माने भारताकडून पहिले षटक टाकले. चहापानापर्यंत न्यूझीलंडने २१ षटके खेळली, यात त्यांनी बिनबाद ३६ धावा केल्या. चहापानानंतर लॅथम-कॉन्वे यांनी २७व्या षटकात न्यूझीलंडचे अर्धशतक फलकावर लावले. खेळपट्टीवर स्थिरावलेला न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला अश्विनने माघारी धाडले. लॅथमने ३० धावा केल्या. लॅथम आणि कॉन्वेने पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी केली. चांगल्या लयीत असलेल्या डेव्हॉन कॉन्वेने आपले ४४व्या षटकात आपले  अर्धशतक पूर्ण केले. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने कॉन्वेला माघारी धाडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मोहम्मद शमीने कॉन्वेचा झेल टिपला. कॉन्वेने १५३ चेंडूचा सामना करत ६ चौकरांसह ५४ धावांची खेळी केली. त्याच्यानंतर कर्णधार केन विल्यमसनची साथ देण्यासाठी रॉस टेलर मैदानात आला. ४९ षटकानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा जमवल्या असून ते अजून ११६ धावांची पिछाडीवर आहेत. विल्यमसन १२, तर रॉस टेलर शून्यावर नाबाद राहिला आहे.

 

हेही वाचा – सैराट झालं जी..! स्मृती मंधानाचा फोटो पाहून चाहते झाले घायाळ

भारताचा पहिला डाव

पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला १९ जूनपासून सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि केन विल्यमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवशी भारताने १४६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारत पहिल्या डावात ९२.१ षटकात २१७ धावा करू शकला. विराटने ४४ तर अजिंक्यने ४९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने ३१ धावांत ५ बळी घेत भारताच्या डावाला सुरूंग लावला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz icc world test championship day four report adn
First published on: 21-06-2021 at 20:16 IST