भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात खातेही उघडता आले नाही. फिरकीपटू एजाज पटेलने त्याला पायचीत पकडलेय. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि केवळ ४ चेंडू खेळून बाद झाला. टी-२० वर्ल्डकपनंतर विराटने विश्रांती घेतली होती. कानपूर कसोटीतही तो खेळला नव्हता.

मयंक अग्रवाल आणि शुबमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८० धावा जोडल्या. त्यानंतर एजाज पटेलने अप्रतिम खेळ दाखवत भारतासाठी ३ बळी घेतले. २८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने गिलला रॉस टेलरकरवी झेलबाद केले. गिलने ७१ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावा केल्या. त्यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली बाद झाले. दोघांनाही खाते उघडता आले नाही.

हेही वाचा – IND vs NZ : भारीच ना..! ‘मुंबईचा मुलगा’ न्यूझीलंडकडून वानखेडेवर खेळतोय कसोटी सामना; जाणून घ्या कोण आहे तो?

विराटने मैदानावरील पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले आणि डीआरएसची मागणी केली. चेंडू त्याच्या बॅटला आणि पॅडला एकाच वेळी लागल्याचे रिव्ह्यूमध्ये आढळून आले. यामुळे टीव्ही अंपायरनेही निर्णय कायम ठेवला आणि विराटला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

विराट बाद झाल्यानंतर पॅव्हिलियनमध्ये परतत असताना त्याने आपला राग व्यक्त केला. चौकाराच्या सीमारेषेरवर विराटने आपली बॅट जोरात आपटली. पंचांच्या या निर्णयावर नेटिझन्स सोशल मीडियावर चांगलेच संतापले. विराटच्या बाद होण्याशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. काही टीव्ही समालोचकांनीही विराटचे समर्थन केले आणि पंचांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.