Haris Rauf, India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुपर ४ फेरीतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ केला आणि पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. हा सामना चौकार आणि षटकारांसह खेळाडूंमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळेही चर्चेत राहिला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना डिवचण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण भारतीय फलंदाजांनी त्यांना आपल्या बॅटने चांगलं उत्तर दिलं. यादरम्यान सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या हरिस रौफला अद्दल घडवली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेत विराट कोहलीने हरिस रौफची चांगलीच धुलाई केली होती. हरिस रौफच्या षटकात धावा कुटून विराटने भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला होता. तेव्हापासून जेव्हा जेव्हा हरिस रौफ मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा क्रिकेट चाहते त्याला विराट कोहलीचं नाव घेऊन डिवचताना दिसून येत असतात. यावेळी विराट कोहली नसतानाही क्रिकेट चाहत्यांनी हरिस रौफची चांगलीच फिरकी घेतली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, क्रिकेट चाहते हरिस रौफसमोर कोहली..कोहली नावाचा जयघोष करताना दिसत आहे. तर हरिस रौफ कानावर हात ठेवताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सामन्यात हरिस रौफने अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलला देखील चिडवण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघांनी आपल्या बॅटने प्रत्युत्तर देत हरिस रौफला चांगलीच अद्दल घडवली.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानने २० षटकांअखेर १७१ धावा केल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी वादळी सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून १०० धावांची भागीदारी केली. यादरम्यान अभिषेक शर्माने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर शुबमन गिलचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. पाकिस्तानने दिलेलं आव्हान भारतीय संघाने १९ व्या षटकात पूर्ण करत ६ गडी राखुन दमदार विजयाची नोंद केली. हा भारतीय संघाचा या स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला आहे.