India vs Pakistan, Hong Kong Super Sixes: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वी आशिया चषक २०२५ स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ३ वेळा आमनेसामने आले होते. या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. दरम्यान हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या सुपर सिक्सेस लीग स्पर्धेत पुन्हा एकदा भारत- पाकिस्तान सामना रंगला. या सामन्यातही भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे.
या स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार अब्बास आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत ६ षटकात ४ गडी बाद ८६ धावा केल्या. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी ६ षटकात ८७ धावा करायच्या होत्या.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानने दमदार सुरूवात करत १ गडी बाद ४१ धावांपर्यंत मजल मारली होती. इतक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबवावा लागला. त्यामुळे सामन्याचा निकाल हा डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला. डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतीय संघ ३ षटकांनंतर भारतीय संघ २ धावांनी आघाडीवर होता. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना २ धावांनी आपल्या नावावर केला. भारतीय संघाचा पुढील सामना कुवैतविरूद्ध होणार आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याची संधी असणार आहे. सध्या पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असून पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
भारतीय संघाने केल्या ८६ धावा
या सामन्यात भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या रॉबिन उथप्पा आणि भरत चिप्लीच्या जोडीने दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १५ चेंडूत ४२ धावा जोडल्या. यादरम्यान उथप्पाने २ चौकार आणि ३ षटकारांसह २८ धावांची खेळी केली. तर चिप्लीने २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या बिन्नीला अवघ्या ४ धावा करता आल्या. कर्णधार दिनेश कार्तिकने २ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने नाबाद १७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने पाकिस्तानसमोर विजयासाठी ८७ धावांचे आव्हान ठेवले होते.
