India vs Pakistan, Asia Cup 2025: भारतीय संघ टी-२० वर्ल्ड चॅम्पियन का आहे, हे भारताच्या युवा खेळाडूंनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यातही भारतीय संघ पाकिस्तानवर भारी पडला. याआधी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी धुव्वा उडवला होता. आता सुपर ४ फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला दणका देत ६ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली आहे.
या सामन्याची सुरूवातही नो हँडशेकने झाली. गेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हस्तांदोलन करणं टाळलं होतं. यावेळी सूर्याने पाकिस्तानच्या कर्णधाराकडे पाहिलं सुद्धा नाही. भारताने पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांअखेर ५ गडी बाद १७१ धावा करत भारतीय संघाला १७२ धावांचं आव्हान दिलं.
भारतीय संघाची दमदार सुरूवात
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७२ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाचा मजबूत फलंदाजीक्रम पाहता हे आव्हान भारतीय संघासाठी फार मोठं नव्हतं. भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. अभिषेकने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकून भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली. त्याला गिलची चांगली साथ मिळाली.
दोघांनी मिळून ९ व्या षटकात भारतीय संघाला १०० धावांचा पल्ला गाठून दिला. अभिषेकने २४ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. गिलला देखील आपलं अर्धशतक झळकावण्याची संधी होती. पण तो ४७ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर अभिषेक शर्मा देखील ७४ धावा करून माघारी परतला.ही जोडी बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला. संजू सॅमसनने १३ धावांची खेळी केली. शेवटी तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याने मिळून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
पाकिस्तानने दिलं १७१ धावांचं आव्हान
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. पाकिस्तानकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या साहिबजादा फरहानने ४५ चेंडूंचा सामना करत ५८ धावांची खेळी केली. तर फखर जमानने १५ धावांची खेळी केली. सईम अयुबने २१, हुसेन तलतने १० आणि मोहम्मद नवाजने २१ धावांची खेळी केली. शेवटी सलमान अली आगाने नाबाद १७ आणि फहिम अशरफने नाबाद २० धावांची खेळी करून पाकिस्तानला २० षटकांअखे १७१ धावांवर पोहोचवलं.