IND vs PAK Virat Kohli Axar Patel Viral Video: चॅम्पियन्स ट्रॉफी भारत वि. पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीच्या शानदार शतकासह भारताने विजयाची नोंद केली. यासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतील सलग दुसरा सामना जिंकत सेमीफायनलमधील आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. भारताने फक्त विजयचं नाही मिळवला तर २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पराभवाचा पाकिस्तानविरुद्धचा बदलाही पूर्ण केला. या सामन्यातील अक्षर पटेल आणि विराट कोहली यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

आपल्या फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीने पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावत दणक्यात पुनरागमन केलं आहे. विराटने १११ चेंडूत ७ चौकारांसह १०० धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी उतरला. विराटने आधी गिलबरोबर आणि नंतर श्रेयस अय्यरबरोबर चांगली भागीदारी रचत टीम इंडियाचा विजय सोपा केला.

विराट कोहली जेव्हा शतकाच्या जवळ होता तेव्हा त्याच्याबरोबर मैदानावर अक्षर पटेल नॉनस्ट्राईकर एंडवर होता. शतकापूर्वी कोहलीही अक्षर पटेलवर वैतागलेला दिसला. विराट जेव्हा ९४ धावांवर खेळत होता. तेव्हा अक्षरने एक धाव घेत विराटला स्ट्राईक दिली. यानंतर पुन्हा विराट कोहली दुसरी धाव घेण्यासाठी पुढे आला पण अक्षर पटेलने धाव घेण्यासाठी नकार दिला, कारण अक्षरला विराट कोहलीचं शतक पूर्ण होण्यासाठी त्याला स्ट्राईकवर ठेवायचं होतं.

पण अक्षरने धाव घेण्यासाठी नकार देताच विराट त्याच्यावर वैतागला आणि त्याला ओरडताना दिसला. विराटचं म्हणणं होतं की आरामात दोन धावा काढता आल्या असत्या. तू धावला का नाही, असं विराट त्याला म्हणत होता. विराट वैतगलेला पाहून अक्षरही त्याला काहीतरी बोलताना दिसला. जणू काही अक्षर त्याला तू तुझं शतक पूर्ण कर असं सांगताना दिसत असल्याचे चाहते म्हणत आहेत आणि अक्षर पटेलच्या या कृतीचं सर्वांनी भरभरून कौतुक केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षर पटेलसह रोहित शर्मा आणि संपूर्ण संघ तसेच त्याचे चाहतेही या शतकाची आतुरतेने वाट पाहत होते. टीम इंडिया हा सामना जिंकणार हे सामन्याच्या खूप आधीपासून स्पष्ट झाले होते. पण अखेरीस सर्वांना प्रतीक्षा होती विराट कोहलीच्या ५१व्या वनडे शतकाची. कोहलीने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला आणि आपले शतकही पूर्ण केले. कोहली त्याच्या शतकापासून अवघ्या काही धावा दूर होता, तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये बसलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्याला षटकार मारून शतक पूर्ण कर, असं सांगताना दिसला. हा व्हीडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.