दक्षिण आफ्रिका ऐतिहासिक विजयाच्या समीप पोहोचले होते, परंतु अखेरच्या क्षणी त्यांना सामना अनिर्णीत राखावा लागला. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फॅफ डय़ू प्लेसिसने कसोटीच्या या निकालाविषयी मात्र समाधान प्रकट केले आहे.
दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ४५८ धावांचे आव्हान होते. परंतु डय़ू प्लेसिसने १३४ धावांची शानदार खेळी साकारली आणि एबी डी व्हिलियर्ससोबत २०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेला ऐतिहासिक विजयाची आशा धरता आली. परंतु दक्षिण आफ्रिकेला विजयापासून आठ धावांनी वंचित राहावे लागले.
‘‘प्रसारमाध्यमांनी आमच्याविषयी चांगले लिहिले आहे. मोठय़ा आव्हानाची तमा न बाळगता खेळपट्टीवर तग धरून आम्ही केलेल्या फलंदाजीबाबत आणि सामन्याच्या निकालाबाबत मी समाधानी आहे,’’ असे प्लेसिस यावेळी म्हणाला.