ब्रेकनंतर परतलेला कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत आपल्या जुन्या शैलीत दिसला. त्याने जिथे सोडले होते, तिथून फलंदाजीला सुरुवात केली. बांगलादेशविरुद्ध दुखापतग्रस्त असतानाही अर्धशतक झळकावणाऱ्या रोहितने सलामीवीर शुभमन गिलसह या सामन्यात संघाला चांगली सुरुवात करून दिली. या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेसमोर ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले.
या दोन्ही फलंदाजांनी लंकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत १९.४षटकांत १४३ धावांची भागीदारी केली. गिल ६० चेंडूत ७० धावा करून बाद झाला. त्याने ११ चौकार लगावले. त्याचवेळी रोहितचे शतक अवघ्या १७ धावांनी हुकले. त्याने ६७ चेंडूत ८३ धावांची धडाकेबाज खेळी केली. हिटमॅनने बाद होण्यापूर्वी ११ चौकार आणि ३ षटकार मारले. या खेळीच्या जोरावर रोहितने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
रोहितने दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर फलंदाज हाशिम आमलाचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून १५० डावांमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा हा विक्रम आहे. अमलाने एकदिवसीय सामन्यांच्या पहिल्या १५० डावांमध्ये ६० वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. रोहितने श्रीलंकेविरुद्ध अर्धशतर झळकावत हा विक्रम मोडला. सलामीवीर म्हणून त्याने ५० प्लस ६१ वेळा धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर आणि शिखर धवन यांनी ५३ वेळा अशी कामगिरी केली आहे.
रोहितने पूर्ण केल्या ९५०० धावा –
रोहित शर्माने या सामन्यात वनडे फॉरमॅटमध्ये ९५०० धावांचाही टप्पा पूर्ण केल्या. त्याने २३६व्या एकदिवसीय सामन्यात हा आकडा पार केला आहे. आता त्याच्या नावावर ९५३७ धावांची नोंद आहे.तो आता भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सहावा फलंदाज ठरला आहे. केवळ एमएस धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हिटमॅनच्या पुढे आहेत.
हेही वाचा – IND vs SL 1st ODI: टीम इंडियाने रचला नवा विश्वविक्रम; ऑस्ट्रेलियाला मागे टाकत बनला जगातील पहिलाच संघ
सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक –
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये क्षेत्ररक्षण करताना रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तो पूर्ण वेळ मैदानाबाहेर राहिला. संघाची गरज पाहून तो ९व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्यावेळी रोहितने २८ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या होत्या. म्हणजे ज्या ठिकाणी सोडले होते, तिथूनच त्याने नव्याने सुरुवात केली आणि ८३ धावांचे योगदान दिले.