Dasun Shanaka, India vs Srilanka: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये थरारक सामना रंगला. सुपर ४ फेरीतील शेवटच्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. भारतीय संघाने श्रीलंकेला विजयासाठी २०३ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने भारतीय संघाची बरोबरी करत २०२ धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. मात्र दासून शनाकाने शेवटच्या चेंडूवर केलेली एक चूक श्रीलंकेला चांगलीच महागात पडली. ती चूक केली नसती, तर श्रीलंकेने हा सामना जिंकला असता. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
श्रीलंकेने केली बरोबरी
श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी २०३ धावा करायच्या होत्या. ही आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या होती. त्यामुळे भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. सलामीला आलेला पथुम निसंका शेवटच्या षटकापर्यंत उभा राहिला. त्याने १०७ धावांची खेळी केली. पथुम निसंका शेवटच्या चेंडूपर्यंत उभा राहिला असता तर, श्रीलंकेने या सामन्यात सहज विजय मिळवला असता. पण निर्णायक क्षणी तो बाद होऊन माघारी परतला. त्याला साथ देत कुसल परेराने ५८ धावांची खेळी केली. दोघांनी मिळून १२७ धावांची भागीदारी केली.
शनाकाची एक चूक श्रीलंकेला महागात पडली
या सामन्यात २०३ धावांचा डोंगर सर करत असताना, श्रीलंकेच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत आपली पकड बनवून ठेवली होती. शेवटच्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर श्रीलंकेला १२ धावा करायच्या होत्या. श्रीलंकेच्या फलंदाजांनी ५ चेंडूत ९ धावा केल्या. शेवटच्या १ चेंडूवर श्रीलंकेला विजयासाठी ३ धावा करायच्या होत्या. त्यावेळी दासून शनाका स्ट्राईकवर होता आणि लियान्गे नॉन स्ट्राइकला होता. विजयासाठी ३ धावा आणि सामना सुपर ओव्हरमध्ये घेऊन जाण्यासाठी २ धावांची गरज होती. हर्षितने टाकलेल्या चेंडूवर शनाकाने लेग साईडच्या दिशेने फटका मारला. दोघांनी पहिली धाव वेगाने पूर्ण केली. त्यानंतर शनाकाने दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी डाईव्ह मारली. पण मुख्य बाब म्हणजे अक्षर पटेलच्या हातून चेंडू सुटला होता. थ्रो केल्यानंतर हर्षितच्या हातूनही चेंडू सुटला होता. पण शनाकाने २ धावांवर समाधान मानलं. त्याने तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने मारली बाजी
हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये अवघ्या २ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी पहिल्याच चेंडूवर ३ धावा घेत हा सामना आपल्या नावावर केला.
भारतीय संघाने केल्या २०२ धावा
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. शुबमन गिल दुसऱ्याच षटकात बाद होऊन माघारी परतला. तर अभिषेक शर्माने १ बाजू धरून ठेवली होती. अभिषेकने ३१ चेंडूंचा सामना करत ६१ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने १२, संजू सॅमसनने ३९, हार्दिक पंड्याने २ धावांची खेळी केली. शेवटी तिलक वर्माने नाबाद ४९ आणि अक्षर पटेलने नाबाद २१ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २०२ धावांवर पोहोचवली.