Six On Dead Ball In India vs Srilanka Match: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषक २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना पार पडल. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २०२ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना पथुम निसंकाच्या शतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने देखील २०२ धावांची बरोबरी साधली. या सामन्याच निकाल सुपर ओव्हमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने बाजी मारत सामना खिशात घातला. या सामन्यात वरूणच्या गोलंदाजीवर पथुम निसंकाने षटकार मारला होता. पण षटकार मारूनही त्याला ६ धावा दिल्या गेल्या नाहीत, नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, धावांचा पाठलाग करत असताना कुसल परेरा आणि पथुम निसंकाची जोडी मैदानावर होती. दोघांनी १२७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान पथुम निसंकाने वरूण चक्रवर्तीच्या चेंडूवर षटकार मारला. पण अंपायरने हा चेंडू डेड बॉल घोषित केला. भारतीय संघाकडून १० वे षटक टाकण्यासाठी वरूण चक्रवर्ती गोलंदाजीला आला होता. वरूणने या षटकातील तिसरा चेंडू टाकला. या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या निसंकाने लाँग ऑनच्या दिशेने मोठा फटका मारला. अक्षर पटेलकडे सोपा झेल घेण्याची संधी होती. पण अक्षरच्या हातून हा झेल सुटला आणि चेंडू ६ धावांसाठी सीमारेषेपार गेला. पण अंपायरने हा चेंडू डेड बॉल घोषित केला. वरूणने चेंडू टाकण्याआधीच पंचांनी डेड बॉलचा इशारा केला होता. पण ते वरूण चक्रवर्तीच्या लक्षात आलं नाही.

भारतीय संघाने केल्या २०२ धावा

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. शुबमन गिल दुसऱ्याच षटकात बाद होऊन माघारी परतला. तर अभिषेक शर्माने १ बाजू धरून ठेवली होती. अभिषेकने ३१ चेंडूंचा सामना करत ६१ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने १२, संजू सॅमसनने ३९, हार्दिक पंड्याने २ धावांची खेळी केली. शेवटी तिलक वर्माने नाबाद ४९ आणि अक्षर पटेलने नाबाद २१ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २०२ धावांवर पोहोचवली.

सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने मारली बाजी

या सामन्यात श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी २०३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून सलामीला आलेल्या निसंकाने दमदार शतकी खेळी केली. त्याने कुसल परेरासोबत मिळून १२७ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर हा श्रीलंकेला देखील २०२ धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटी सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने अवघ्या २ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताने पहिल्याच चेंडूवर ३ धावा करत सामना आपल्या नावावर केला.