IND vs SLVirat Kohli fights with Asitha Fernando : विराट कोहली मैदानावरील आक्रमकतेसाठी ओळखला जातो, जेव्हा जेव्हा विरोधी संघातील कोणताही खेळाडू त्याच्याशी हुज्जत घालायचा प्रयत्न करतो, तेव्हा किंग कोहली त्याला तोंडानेच नव्हे तर बॅटने जोरदार प्रत्युत्तर देतो. बुधवारी संध्याकाळी देखील श्रीलंकेच्या असिता फर्नांडोने त्याच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी विराट कोहलीही त्याला प्रत्युत्तर देताना दिसला. परंतु यावेळी तो बॅटने कोणतेही उत्तर देऊ शकला नाही. आता विराट कोहली असिथा फर्नांडोने यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्यानंतर कोहली आणि फर्नांडो हँडशेक करत हसताना दिसले.

विराट कोहलीसाठी हा श्रीलंका दौरा एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो केवळ २० च्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. तर मागील दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने केवळ २४ आणि १४ धावा केल्या होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराटला या संपूर्ण मालिकेत फिरकीपटूंनी एलबीडब्ल्यू आऊट केले, हे त्याच्या कारकिर्दीत प्रथमच घडले आहे.

भारताने मालिका २-० ने गमावली –

श्रीलंकेविरुद्धची ही तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताला २-० ने गमावावी लागली. श्रीलंका संघ १९९७ नंतर प्रथमच भारताविरुद्ध मालिका जिंकण्यात यश आले. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर यजमान संघाने आपल्या भक्कम फिरकी गोलंदाजांच्या बळावर पुढील दोन एकदिवसीय सामने जिंकले. मालिकेच्या सुरुवातीला श्रीलंकेचा संघ थोडा कमकुवत दिसत होता, त्यांचे अनेक गोलंदाज दुखापतीमुळे किंवा खराब प्रकृतीमुळे या मालिकेचा भाग होऊ शकले नाहीत, तर वानिंदू हसरंगा देखील मालिकेच्या मध्यभागी दुखापतीमुळे बाहेर गेला होता. असे असतानाही श्रीलंकेच्या संघाने या मालिकेत भारताला एकही सामना जिंकण्याची संधी दिली नाही.

हेही वाचा – Swapnil Kusale : VIDEO: स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक पदक ठेवलं दगडूशेठ गणपतीच्या चरणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद –

टीम इंडियाने मालिका गमावल्याने कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. श्रीलंकेविरुद्ध द्विपक्षीय वनडे मालिका गमावणारा तो तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर (१९९७) आणि मोहम्मद अझरुद्दीन (१९९३) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने लंकेविरुद्धची द्विपक्षीय वनडे मालिका गमावली होती. भारताने शेवटची एकदिवसीय मालिका सचिन तेंडुलकरच्या नेतृत्त्वाखाली १९९७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध गमावली होती. यानंतर २७ वर्षांनी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने नकोसा विक्रम केला आहे.