India vs West Indies 1st Test Day 1 Live Updates: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या अहमदाबाद कसोटीत भारताने दणदणीत विजय मिळवला आणि अडीज दिवसात कसोटी सामना संपला आहे. भारताने पहिल्या कसोटीत १४० धावांनी आणि एका डावाने विजय मिळवलाय. टीम इंडियाने सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. भारताकडून दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने ४ विकेट्स, सिराजने ३ विकेट्स, कुलदीपने २ विकेट्स आणि सुंदरने एक विकेट मिळवली. वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या गोलंदाजीविरूद्ध फलंदाजी करण्यात अपयशी ठरला आणि भारताने एकतर्फी विजय मिळवला. यासह भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच भारताने आपला डाव घोषित केला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ बाद ४४८ धावा केल्या आहेत. भारताने वेस्ट इंडिजला १६२ धावांवर सर्वबाद केल्यानंतर पहिल्या डावात उत्कृष्ट फलंदाजीच्या बळावर द्विशतकी आघाडी मिळवली आहे. भारताकडून दुसऱ्या दिवशी केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी शतकं झळकावली. भारतीय फलंदाजांपुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले.

कुलदीपने घेतली अखेरची विकेट

कुलदीप यादवने ४६व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सील्सला झेलबाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

जडेजाच्या खात्यात चौथी विकेट

रवींद्र जडेजाने ४२व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर लेनला सिराजकरवी झेलबाद केलं. यासह वेस्ट इंडिजने नववी विकेट गमावली.

सिराजचं डबल विकेट मेडन षटक

मोहम्मद सिराजने ३७व्या षटकात २ विकेट्स घेत वेस्ट इंडिजला लागोपाठ धक्के दिले. चौथ्या चेंडूवर ग्रीव्हसला पायचीत केलं तर अखेरच्या चेंडूवर उपकर्णधार वॅरिकन झेलबाद झाला. यासह विडिंज संघाने ९८ धावांवर ८ विकेट्स गमावले आहेत.

वॉशिंग्टनने मोडली भागीदारी

वॉशिंग्टन सुंदरने ३५व्या षटकात एथेनेजला आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. यासह त्याने वेस्ट इंडिजची महत्त्वपूर्ण भागीदारी तोडली.

लंचब्रेक

वेस्ट इंडिजने पहिल्या सत्रात ५ बाद ६६ धावा केल्या आहेत. एथेनेज २७ धावा तर ग्रीव्हस १० धावा करत खेळत आहेत. भारताकडून जडेजाने ३, कुलदीपने १ व सिराजने १ विकेट घेतली आहे.

जैस्वालचा शानदार झेल अन् जडेजाचे ३ विकेट्स

२१व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शे होपने चेंडूवर जोरात फटका मारला, पण सीमारेषेच्या दिशेने जाणारा चेंडू जैस्वालने पुढे डाईव्ह मारत शानदार झेल टिपला. यासह वेस्ट इंडिजचा निम्मा संघ माघारी परतला. वेस्ट इंडिजने ४५ धावांत ५ विकेट्स गमावले आहेत.

कुलदीपच्या फिरकीने उडवला त्रिफळा

कुलदीप यादवने स्पेलमधील दुसऱ्याच षटकात नुकत्याच आलेल्या वेस्ट इंडिजच्या कर्णधाराला माघारी धाडलं. कुलदीपच्या फिरकीवर रोस्टन चेस क्लीन बोल्ड झाला.

जडेजाने दिला तिसरा धक्का

रवींद्र जडेजाच्या खात्यात दुसरी विकेट मिळाली आहे. जडेजाने कमालीचा चेंडू टाकला आणि बॅटची कड घेत स्लिपमध्ये गेला. जिथे राहुलने एक उत्कृष्ट लो कॅच टिपला आणि संघाला तिसरं यश मिळवून दिली.

जड्डूच्या खात्यात विकेट

रवींद्र जडेजाने ११व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर दुसरा सलामीवीर शॉर्ट लेगवर झेलबाद झाला. जडेजाच्या कमालीच्या चेंडूवर कॅम्पबेल सोपा झेल हाती सोपवत माघारी परतला. यासह वेस्ट इंडिजने २ विकेट्स गमावत २४ धावा केल्या आहेत.

भारताच्या खात्यात पहिली विकेट

सलामीवीर तेजनारायण चंद्रपॉल दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. मोहम्मद सिराजच्या आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नितीश रेड्डीने हवेत झेप घेत कमालीचा झेल टिपला.

वेस्ट इंडिजची सावध सुरूवात

वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावाला सावध सुरूवात केली आहे. ६ षटकांत चंद्रपॉल व कॅम्पबेल यांनी मिळून १२ धावा केल्या आहेत.

भारतीय संघाने पहिल्या कसोटीत डाव केला घोषित

अहमदाबाद कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारताने डाव घोषित केला आहे. भारताने ५ बाद ४४८ धावा केल्या आहेत. यासह संघाकडे पहिल्या डावात २८६ धावांची आघाडी आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजीला उतरणार आहे.

दुसऱ्या दिवशी काय घडलं?

भारत वि. वेस्ट इंडिज कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सावध सुरूवातीनंतर केएल राहुल आणि शुबमन गिलने चांगली भागीदारी रचली. शुबमन गिल अर्धशतक करत झेलबाद झाला. यानंतर केएल राहुलने १९७ चेंडूत १२ चौकारांसह शतकी खेळी केली. त्यानंतर ध्रुव जुरेलने उत्कृष्ट खेळी करत २१० चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह १२५ धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजा १७६ चेंडूत ६ चौकार व ५ षटकारांसह १०४ धावांची खेळी करत नाबाद राहिला.