Dhruv Jurel Celebration For His Father After Scoring Century: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी वेस्टइंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी वेस्टइंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. केएल राहुलने शतक झळकावल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने देखील आपलं शतक पूर्ण केलं आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २५० हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. ही आघाडी मिळवून देण्यात भारताच्या टॉप ५ फलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली आहे. भारताकडून सलामीला आलेल्या केएल राहुलने १०० धावांची खेळी केली. तर कर्णधार शुबमन गिल अर्धशतक झळकावून माघारी परतला.ध्रुव जुरेलला साथ देताना जडेजाने देखील अर्धशतक झळकावलं. दरम्यान अर्धशतक झळकावल्यानंतर ध्रुव जुरेलने हटके सेलिब्रेशन देखील केलं आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ध्रुव जुरेलचं हटके सेलिब्रेशन
यष्टीच्या मागे ध्रुव जुरेलने स्वत:ला अनेकदा सिद्ध केलं आहे. पण फलंदाजीत त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नव्हती. इंग्लंड दौऱ्यावर ऋषभ पंत दुखापतग्रस्त असताना ध्रुव जुरेलला यष्टीरक्षण करण्याची संधी मिळाली होती. पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. आता वेस्टइंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेत ध्रुव जुरेलचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला. या संधीचा फायदा घेत त्याने १९० चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याचं कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक ठरलं आहे.
शतक झळकावल्यानंतर त्याने हटके सेलिब्रेशन केलं. त्याने बॅट उभी धरून डावीकडे सरकवली. त्यानंतर त्याने हेल्मेट काढलं आणि बॅट हवेत उंचावली. ध्रुव जुरेलचे वडील कारगिल युद्धात लढलेले भारतीय सेनेतील सेवानिवृत्त जवान आहेत. वडिलांच्या लष्करी सेवेबद्दलचा आपला आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी त्याने हा खास जल्लोष केला असल्याचं म्हटलं जात आहे. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागलं आहे.